मुंबई / जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे मुक्ताईनगर, रावेर, चोपड्यासह अन्य तालुक्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मदतीची मागणी केली. त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकर्यांना पालघरच्या धरतीवर मदत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली असून याबाबत लवकरच शासनाचे निर्देश जारी होणार आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याबाबत वृत्त असे की, गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाने मोठा फटका दिला. यामुळे आधीच जेरीस आलेल्या शेतकर्यांची जबर हानी झाली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने या नुकसानीची पाहणी केली असून प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते . यासोबत त्यांनी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत करावी अशी आग्रही मागणी केली.
आज राज्य मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळासमोर जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांच्या झालेल्या हानीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात १६ ते ३१ मे २०२१ या १० दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व चक्री वादळाने थैमान घातले होते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे केळी, पिकांसह अन्य पिकांचेही तसेच घरांची पडझड , गुरांची जिवित हानी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण २३७ गावांना बाधा पोहचली असून ४५१७ शेतकर्यांचे ३७०९ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, निसर्गाच्या अवकृपेमुळे जिल्ह्यातील २७५१ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले. यासोबत पपई ४२ हेक्टर व इतर फळ पिके ९१६ हेक्टर असे एकूण ३७०९ हेक्टर वरील फळ पिकांचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर , रावेर, चोपडा, बोदवड एरंडोल व धरणगाव या तालुक्यांमध्ये नुकसान झाले असून त्यात मुक्ताईनगर, रावेर व चोपडा व बोदवड तालुक्यात सर्वाधिक केळीचे नुकसान झालेले आहे.
यामुळे राज्य शासनाने पालघरच्या धरतीवर जळगाव जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत लवकरच निर्देश जारी होणार आहेत. यामुळे पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आजच्याच मंत्रीमंडळ बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांमधील १३ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मांडला. यात मुक्ताईनगर तालुक्यातील मेंढोदे, बेलसवाडी, बेलखेडे, भोकणी धामंदे, पातोंडी, पिंप्रीनांदू व अंतुर्ली ८ गावे तर रावेर तालुक्यातील सुलवाडी, भामलवाडी, मांगलवाडी, ऐनपूर, सोनबर्डी तांदलवाडी ५ गावं असे १३ गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली. यावर सकारात्मक विचार करण्यात येऊन लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.