नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने एससी-एसटी आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयावरून दलित संघटनांमध्ये संताप उसळला आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी कोर्टाच्या निर्णयाला विरोध केला आहे. तसेच देशभरातील अनेक दलित संघटना या निर्णयाविरोधात आंदोलनाच्या पवित्रात असून त्यांनी २१ ऑगस्टला भारत बंदची घोषणा देखील केली आहे.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटी आरक्षणामध्ये उप-कोटा निश्चित करण्यास मान्यता दिली होती. एससी आणि एसटी प्रवर्गातील कोणतीही जात अधिक मागासलेली आहे, असे राज्य सरकारांना वाटत असेल, तर त्यासाठी उप-कोटा निश्चित केला जाऊ शकतो, असे कोर्टाने दिलेल्या निर्णयात म्हटले होत. या सोबतच ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाने ४-३ च्या बहुमताने एससी आणि एसटी मध्ये क्रिमी लेयर बंधनकारक असले पाहिजे असे देखील सांगितले होते. क्रिमी लेयरच्या खाली येणाऱ्या लोकांना आरक्षणाचा लाभ मिळू नये. त्याऐवजी त्याच समाजातील गरिबांना प्राधान्य द्यायला हवे, असे देखील कोर्टानं म्हटलं होत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले. तर काहींनी विरोध केला आहे. दलित संघटना या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाच्या तयारीत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर कोर्टाच्या निर्णयाविरोधात मोठा ट्रेंड सुरू आहे. इतकेच नाही तर अनेक दलित संघटनांकडून या निर्णयाविरोधात २१ ऑगस्टला भारत बंदचीही हाक देखील देण्यात आली आहे. विशेषत: बसपा प्रमुख मायावती यांनीही याला विरोध केला आहे. अशा प्रकारे आरक्षण संपवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. उप-कोट्याबाबत मायावती म्हणाल्या की, याद्वारे सरकार कोणत्याही जातीला त्यांच्या इच्छेनुसार कोटा देऊ शकतील आणि त्यांचे राजकीय स्वार्थ पूर्ण करू शकतील. कोर्टाने दिलेल्या हा निर्णय योग्य नाही. एवढेच नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या क्रिमी लेयरबाबतच्या निर्णय देखील चुकीचा असल्याचं त्यांनी म्हणत त्याला विरोध केला आहे.