जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथे चोरट्यांनी एकाच रात्री सात बंद घरे फोडल्याची घटना ताजी असतांना शिरसोलीतही चोरट्यांनी सहा घरे फोडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून चौकशीला सुरूवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील धनश्री हॉटेल जवळील प्लॉट भागात मध्यरात्री चोरट्यांनी बंद घरे असल्याचे संधी साधून एकाच रात्री एकुण ६ बंद घरे फोडून रोकडसह लाखो रूपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले आहे. हा प्रकार शुक्रवार १० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. या घरफोड्यांमध्ये , राजेंद्र रामा बारी यांच्या घरातून १५ हजार रुपयांची रोकड, महेंद्र रामदास चव्हाण यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख व ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, योगेश भिमराव देशमुख यांच्या घरातून ३५ हजार रूपये किंमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सपना रविंद्र गोंधळे यांच्या घरातून १० हजार रूपये किंमतीचे ३ गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर सुधीर भावराव पाटील आणि पुनमचंद विठ्ठल देवरे यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ञ पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी घर मालकांशी संवाद साधुन माहिती घेण्यात आली. याप्रकरणी महेंद्र रामदास चव्हाण यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.