भुसावळात आरोग्य संवर्धनासाठी सायकल वारी

भुसावळ प्रतिनिधी । आरोग्य व अध्यात्म यांचा सुरेख संगम साधत पर्यावरणाचाही समतोल साधला जावा, या हेतूने येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे सायकल वारी आयोजित करण्यात आली. 

मार्गशीर्ष महिना व चंपाषष्ठीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र तरसोद येथील श्रीगणरायाचे दर्शन घेतले. सायकल वारीचा श्रीगणेशा भुसावळ पोस्ट विभागाचे अधीक्षक पी. बी. सेलूकर यांनी सायकलमध्ये हवा भरून शुभारंभ केला. 

शुभारंभाप्रसंगी पी. बी. सेलूकर म्हणाले की, आपण लहान असताना सायकल चालवली जायची. पण मोठे होताच आपण सायकल चालवणे सोडून देतो. परंतु नियमित सायकल चालवण्याचे अनेक फायदे असतात. सायकल चालवल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. आजार कमी होण्यास मदत होते. वजन कमी होते. हृदय, फुफ्फुसे आणि रक्‍त प्रवाह सुधारतो. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. सायकल चालवण्याने ताकद, समतोल आणि समन्वय हे शारिरीक गुण वाढतात. मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा हे सर्व सायकलिंगने कमी होते. सकाळी सकाळी काही वेळ सायकल चालवली तर रात्री झोपही मस्त झोप लागते, असेही श्री. सेलूकर यांनी सांगितले. दर महिन्याला सायकल वारी आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.

सायकल वारीत संजय ताडेकर, डी. के. पाटील, नाना पाटील, कैलास तांबट, विलास पाटील, समाधान जाधव, प्रविण गांधेले, बी. बी. जोगी यांच्यासह ज्ञानासह मनोरंजन गृप प्रमुख डॉ. जगदीश पाटील यांनी सहभाग घेतला. भुसावळ ते तरसोद हे वीस किलोमीटरचे अंतर सायकलस्वारांनी दीड तासात पार केले.

 

Protected Content