जळगाव । मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करून खंडणी मागण्याची धमकी देणार्यास पोलिसांनी गजाआड केले आहे.
टहाकळी (ता. जामनेर) येथील मयुर भाऊराव मोरे (वय २१, रा. टहाकळी, ता. जामनेर) याने २६ फेब्रुवारी रोजी वरणगाव येथील एका १७ वर्षीय तरुणीच्या व्हाट्सअॅपवर नंबरवर मॅसेज केला. थोड्या वेळाने मयुरने तिच्या मोबाइलवर एक अश्लिल फोटो पाठवला. या फोटोमध्ये फेरबदल केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. यानंतर मयुरने तिला पुन्हा धमकावले. यात त्याने त्याच्याकडे त्या तरूणीचे अश्लील फोटो असल्याचे सांगीतले. हा प्रकार बंद करायचा असल्यास मयुरने १० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोड करत त्याने ७१ हजार ८९० रुपयांची मागणी केली. दरम्यान, त्या तरूणीने पोलिसात धाव घेतली. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राइम पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए. डी. निकम, पोलिस उपनिरीक्षक अंगत नेमाने, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण, स्वाती पाटील व सतीश बाविस्कर यांच्या पथकाने सापळा रचून मयुर याला अटक केली.
दरम्यान, मयूरने खंडणीसाठी नवीन मार्ग शोधून काढला होता. वरणगाव येथून येणार्या एका बसमध्ये बसून भुसावळ शहराजवळ पैसे ठेवलेली पिशवी खिडकीतून खाली फेकायची, असे मयुरने सांगितले होते. मात्र याच भागात असलेल्या पोलीस पथकाने त्याला लागलीच अटक केली.