पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील शहरातील शेवडी गल्ली भागातील रहिवाशी आणि सीआरपीएफ जवान जितेंद्र देविदास चौधरी यांचे श्रीनगर येथे ड्युटी बजावत असताना मध्यरात्री आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शेवडी गल्ली आणि पारोळा शहरात शोककळा पसरली आहे.
श्रीनगर येथून त्यांचे पार्थिव पुण्यात आणले जाणार असून त्यानंतर पारोळा शहरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम बुधवार ५ मार्च रोजी दुपारी कुटीर रुग्णालय, पारोळा समोरील स्टेडियमवर पार पडणार आहे.
जितेंद्र चौधरी यांच्या पश्चात तीन भाऊ, बहीण, दोन लहान मुली (अडीच वर्षांची व आठ महिन्यांची) असा परिवार आहे. वीरगती प्राप्त जवान जितेंद्र चौधरी यांच्या अंत्ययात्रा शेवडी गल्ली येथून सुरू होऊन भवानी चौक, श्रीराम चौक, रथ चौक, क्रांती चौक, वाणी मंगल कार्यालय, आझाद चौक, धरणगाव चौफुली मार्गे पारोळा स्टेडियमवर पोहोचणार आहे. शहरवासीयांनी आपल्या वीर सुपुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.