राजकीय वार्तापत्र : दिलीप घोरपडे
चाळीसगाव | येथील विधानसभा मतदार संघ हा तसे पाहिले तर भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २००९च्या निवडणुकीतील अपवाद वगळता गेली २५ वर्षे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असल्याने भाजपाकडे विधानसभा निवडणुकीसाठी यंदा इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती ही राजकारणाची मुख्य सत्ता समीकरणे जुळवणारी साधने २०१४ च्या निवडणुकीपर्यंत होती, मात्र दोन वर्षांपूर्वी बेलगंगा साखर कारखाना चित्रसेन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबाजी ग्रुपने भाडेतत्त्वावर घेतल्याने बेलगंगावर राजकारण करणाऱ्यांच्या हातातून हा मुद्दा यावेळेस निघून गेलेला आहे. तालुक्यातील राजकीय पक्षांची परिस्थिती पाहता सध्या भारतीय जनता पार्टीकडे कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका पंचायत समिती या राजकारणाच्या बाबतीत जमेच्या असलेल्या संस्था आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित १७ नगरसेवक नगरपालिकेत असून तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आहेत. पंचायत समितीमध्येही जवळपास बरोबरीने सदस्य राष्ट्रवादीकडे आजमितीस आहेत. शिवसेना आज तालुक्यात फक्त अस्तित्व टिकवून आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद यामध्ये शिवसेनेचे सदस्य नसून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसभापती मात्र शिवसेनेचा आहे. नगरपालिकेत केवळ दोन नगरसेवक या पक्षाचे आहेत तर काँग्रेस तालुक्यातून जवळपास संपल्यात जमा आहे.
या मतदारसंघाचे आमदार असलेले उन्मेष पाटील हे लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकीटावर निवडून येऊन खासदार झाल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे येथे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढली आहे. विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध प्रकारची कामे व भेटीगाठी यातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न उमेदवारांनी केले आहेत. यात भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक असलेल्या मंगेश चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. असे असले तरी भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, त्यात प्रामुख्याने खासदार पाटील यांच्या पत्नी सौ.संपदा उन्मेष पाटील, चित्रसेन पाटील, कैलास सूर्यवंशी, डॉक्टर विनोद कोतकर डॉक्टर सुनील राजपूत डॉक्टर संजीव पाटील किशोर पाटील ढोमणेकर, सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी इतरही काही उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे माजी आमदार राजीव देशमुख यांचे एकमेव नाव इच्छुक उमेदवारांमध्ये आहे तर वंचित आघाडी मार्फत मोरसिंग राठोड यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. भाजपा-शिवसेने मध्ये सुरु असलेली ‘तू-तू ; मै-मै’ पाहता युतीचे भवितव्य अद्यापही डळमळीत आहे. शिवसेनेने संभाव्य उमेदवार म्हणून तालुकाप्रमुख रमेश चव्हाण व उपजिल्हाप्रमुख उमेश उर्फ पप्पू गुंजाळ जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील यांच्या उमेदवारीसाठी मुलाखती घेऊन आपली स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे.
भाजपाच्या तिकिटासाठी असलेली रस्सीखेच पाहता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी जास्त इच्छुकांची गर्दी झाली असून पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवारास उमेदवारी देतील, त्याच्याबरोबर पक्षाचे अन्य इच्छुक राहतील किंवा नाही ? ही शंका निर्माण झाली आहे. अशावेळी तालुक्यात भाजपाला मोठ्या बंडाळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खासदार उन्मेष पाटील यांची भूमिकाही यात महत्त्वाची असेल. भाजपा इच्छुक मंगेश चव्हाण यांनी गेल्या वर्षभरापासून तालुक्यात चारा छावणी, नाला खोलीकरण, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांसाठी पंढरपूर वारी तर शिवभक्तांसाठी रायगड वारी, शालेय विद्यार्थ्यांना मिनी सायन्स लॅब, दप्तर वाटप असे उपक्रम राबवून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी शासकीय योजनांची जत्रा भरवून आणि एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचे लाभ देण्याचा उपक्रम राबवून जणू सौ. संपदा पाटील यांच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. तसेच चित्रसेन पाटील यांनी बेलगंगा साखर कारखाना खाजगी म्हणून सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला स्थानिक बाजारपेठ मिळवून देऊन आपल्या उमेदवारीचा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांनी ग्रामीण भागात दौरे करून मतदारांच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने बूथ प्रमुखापासून तर युथ प्रमुखापर्यंत कार्यकर्त्यांचे मिळावे घेऊन पक्षांमध्ये बळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या आदेशाची त्यांचे इच्छुक उमेदवार वाट पहात आहेत.
तालुक्यातील जवळपास १४० खेडी या मतदारसंघात असून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणे, ही उमेदवारांसाठी मोठी तारेवरची कसरत ठरणार आहे. आता आचारसंहिता लागू झाल्याने ही कसरत करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वंचित आघाडी यांचे उमेदवार जवळपास निश्चित असल्याने त्यांनी एकप्रकारे आपल्या प्रचारास सुरुवातही केली आहे. भाजपाच्या तिकिटाचा तिढा सुटेपर्यंत भाजपामधील इच्छुक उमेदवारांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही तर ही जागा युतीमध्ये भाजपाकडे असल्याने शिवसेना युतीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसली आहे. युती न झाल्यास शिवसेना उमेदवारास वेळेवर आपली तयारी ठेवावी लागणार आहे. तालुक्यातील मतदार सुज्ञ असून या मतदारांनी नेहमीच अनपेक्षित निकाल आतापर्यंत दिलेले आहेत. बघुया यावेळी हा निवडणुकीचा आखाडा कसा रंगतो आणि मतदार कुणाला आपला कौल देतो.