पारोळा प्रतिनिधी । एरंडोल, पारोळा व भडगाव या तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात कापसावर आलेल्या लाल्यारोग व बोंडअळी, ज्वारी व मका या पिकांवर अळींचा प्रादुर्भावाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, अशी मागणी आ. चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाव्दारे केली आहे.
विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगाव या तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात कापसावर लाल्यारोग व बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या कापसाची पूर्णपणे नासाडी होत आहे. या अगोदरच उशिराने झालेले वरून राजाचे आगमन, सारखी पावसाची रिप-रिप, मुसळधार पावसासह वादळ, कोरोना काळ यामुळे बळीराजा चारही बाजूंनी होरपळला गेलेला आहे. त्यातच कापसावर आलेला लाल्यारोग व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव याच्याने तोंडाशी आलेला घास निसटून गेलेला आहे. तसेच कापसासह ज्वारी व मका या पिकांवर देखील अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे. अश्या संकटाचा काळात बळीराजाला धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगांव या तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात कापसावर आलेला लाल्यारोग व बोंडअळी, ज्वारी व मका या पिकांवर अळींचा प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि तालुक्याचे तहसिलदार व तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे केलेली आहे.