फैजपूर परिसरात पीकस्थिती समाधानकारक !

 

फैजपूर, प्रतिनिधी । शहरासह परिसरात यंदा खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर समाधानकारक पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला असून पीक स्थिती समाधानकारक आहे. यंदा शेतकऱ्यांनी फैजपूर परिसरात ज्वारी पाठोपाठ कपाशी पेरालाही पसंती दिली आहे.

फैजपूर शहरासह परिसरात अनेक लोकांचे प्रमुख साधन शेती व्यवसाय आहे. रब्बी हंगाम आल्यानंतर मे महिन्यापासून परिसरात पाण्यावरील कपाशीचा पेरा करण्यात आल्यानंतर परिसरात शेतकरी वर्गाकडून मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामे पूर्ण करून सालाबादप्रमाणे खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाने तयारी पूर्ण केली. यानंतर फैजपूर शहर व परिसरात मान्सूनपूर्व पावसाने सरासरी समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या व या भागात यंदा जून महिन्यातच खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्यानंतर वेळेवर पावसाच्या समाधानकारक हजेरीने पीक स्थिती समाधानकारक आहे. काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी कोळपणी, निंदणी, ज्वारीची विरवणी असे कामे पूर्ण करून घेतली आहे. यंदा परिसरात ज्वारी पेराला मोठ्या प्रमाणात पसंती देण्यात आली आहे. यापाठोपाठ कपाशी याबरोबर उडीद, मूग यांचाही चांगला पेरा झाला आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीने पाण्याची चातकासारखी वाट पाहणारे पिके डोलू लागली आहे. पीक स्थिती समाधानकारक असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाची वेळेवर साथ मिळाल्यास बळीराजा खरीप हंगाम घेण्यात कोणतीच कसर सोडणार नाही. शिवाय गुरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे असे सध्यस्थीत तरी चित्र आहे. मे महिन्यात परिसरात पेरा झालेल्या पाण्यावरील कपाशीला मान्सूनपूर्व पावसाचा चांगला फायदा झाला आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने हवालदिल झालेल्या शेतमजूरांच्या हाताला काम मिळत असल्याने शेतमजूरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Protected Content