मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत एका सुप्रसिद्ध कॅफेच्या मालकासोबत एक फसवणुकीची घटना घडली आहे. त्यात 6 गुंड मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून सायन भागातील कॅफे मालकाच्या घरात शिरून त्यांनी तब्बल 25 लाख रुपयांची रोकड घेतली आणि पसार झाले. फसवणुकीच्या या घटनेत पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील माटुंगा भागात एक लोकप्रिय कॅफे चालवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी 6 जण माझ्या सायन रुग्णालयातील घरात गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणून शिरले. त्यांनी आपण निवडणूक ड्युटीवर असल्याची बतावणी केली. तसेच माझ्या घरात लोकसभा निवडणुकीसाठी पैसे ठेवण्यात आल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी माझ्या घराची झडती घेतली. त्यांचा व्यवहार पाहता मी त्यांना माझ्याकडे केवळ व्यवसायाचे 25 लाख रुपयांची रोकड असल्याचे सांगितले. तसेच या पैशांचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचेही सांगितले. त्यानंतर आरोपींनी ते 25 लाख रुपये घेतले व कॅफे मालकाला खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देत पळून गेले.
या घटनेनंतर कॅफे चालकाने सायन पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला असता त्यांनी त्यांच्या घरी कोणताही पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी पाठवण्यात आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर कॅफे चालकाने ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत 6 पैकी 4 जणांच्या मुसक्या आवळल्या.