जळगावात झालेल्या आंदोलनप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कृषी विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी दुपारी शहरात बंदचे आव्हान करण्यात आले होते. शहरातील टॉवर चौकासह आकाशवाणी चौकात जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीसह इतर संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यावर शहर व जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

मंगळवारी भारत बंदला महाविकास आघाडीच्या घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह लोक संघर्ष मोर्चा, मनियार बिरादरी संघटनेच्या वतीने शहरातील टॉवर चौक निषेध आंदोलन आणि आकाशवाणी चौकात रास्ता रोको करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश असतांना पाच पेक्षा जास्त व बेकायदेशीर लोकांना जमवुन सोशल डिस्टन्सिंचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, फारूख शेख अब्दुल, अल्पसंख्याक आघाडी आयोगाचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, अमोल कोल्हे, ज्योती शिवदे यांच्यासह ४० जणांवर पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात तर पोहेकॉ विजय सोना यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर व जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

 

Protected Content