विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जोशीपेठ भागात राहणाऱ्या २० वर्षीय विवाहितेने पतीसह सासरचांच्या छळाला कंटाळून १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यासंदर्भात विवाहितेच्या माहेरच्या मंडळींच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात रविवारी १९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बसुदेव सनत घोरई हे पत्नी तुंपा बसुदेव घोरई यांच्यासह जोशीपेठत वास्तव्याला आहे. दरम्यान पती बसुदेव घोरई याने वारंवार लग्नात माहेरून हुंडा मिळाला नाही म्हणून बाहेरून ५ लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. तसेच पैसे आणले नाही म्हणून सतत विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. दरम्यान या छळाला कंटाळून विवाहिता तुंपा घोरई यांनी शुक्रवार १७ डिसेंबर रोजी रात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी  शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पश्चिम बंगाल येथे राहणारे माहेरच्या मंडळीने जळगावात धाव घेतली होती. यासंदर्भात विवाहितेचे वडील लोकेश वैद्यनाथ पंजा (वय-५२) रा. बालीडांगा पंचायत सुलतानपूर पश्चिम बंगाल यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिली.  त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगी तुम्पा हिला माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला असल्या कारणामुळे या छळाला कंटाळून तिने गळफास घेतला आहे असा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बसुदेव घोरई,  सासरे सनत घोर, सासु अर्चना घोरई,  नणंद, नंदोई (पुर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात रविवारी १९ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी पती वसुदेव घोरई याला ताब्यात घेतले आहे.

 

Protected Content