
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिकमधील वाढत्या रिअल इस्टेट संधींची माहिती जळगावकरांना एका छताखाली मिळावी या उद्देशाने क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये भव्य प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. येत्या ७ ते ९ मार्च दरम्यान सागर पार्क ग्राउंड येथे होणाऱ्या या प्रदर्शनातून नाशिक आणि आसपासच्या भागातील विविध प्रॉपर्टी प्रकल्पांची माहिती गुंतवणूकदारांना मिळणार आहे.

नाशिक हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य आणि प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कृषी क्षेत्रावर आधारित अनेक उद्योग संधी येथे उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून त्या जळगावकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दिली.
गौरव ठक्कर पुढे म्हणाले की, नाशिकला चांगल्या हवामानाचे आणि स्वच्छ हवेचे तसेच मुबलक पाण्याचे वरदान लाभले आहे. त्यामुळे राहणीमानाच्या दृष्टीने नाशिक हे अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मुंबई आणि पुण्यापासून कमी अंतर तसेच देश-विदेशातील प्रमुख शहरांशी वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेट गुंतवणूक भविष्यात अधिक लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. चेन्नई-सुरत महामार्ग, नाशिकजवळ विकसित होणारे वाढवण बंदर तसेच समृद्धी महामार्ग आणि खानदेश एक्सप्रेस वेद्वारे जळगावला सहा पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिक यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना प्रदर्शनाचे समन्वयक सागर शहा यांनी सांगितले की, क्रेडाई सदस्य म्हणजे विश्वासार्ह व्यवहार असे समीकरण निर्माण झाले आहे. गेल्या सुमारे २८ वर्षांपासून कार्यरत असलेली क्रेडाई ही राष्ट्रीय स्तरावरील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असून देशभरातील सुमारे १३ हजारांहून अधिक बांधकाम व्यावसायिक या संस्थेशी जोडलेले आहेत. जळगाव येथे होणाऱ्या या प्रदर्शनात नाशिकमधील अनेक आघाडीचे विकसक सहभागी होणार असून फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्महाऊस, शॉप्स आणि ऑफिसेसचे विविध पर्याय नागरिकांना पाहता येणार आहेत. प्रदर्शनाचा लेआउट आणि व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असेल असेही त्यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे सहसमन्वयक अनंत ठाकरे यांनी सांगितले की, आगामी काळात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे लाखो भाविक शहरात येणार आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधींमुळे भविष्यातील गुंतवणुकीसाठी नाशिक हे एक महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये नाशिकसह इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या भागातील प्रकल्पांचेही पर्याय उपलब्ध राहणार आहेत. या प्रदर्शनाचे प्रायोजक म्हणून अर्बन स्टाईल्स तर सहप्रायोजक म्हणून क्रिश ग्रुपने जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली.
सागर पार्क येथे ७, ८ आणि ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खिवंसरा, उदय घुगे, अनिल आहेर, अंजन भालोदिया, आयपीपी कृणाल पाटील, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, हंसराज देशमुख तसेच मॅनेजिंग कमिटी सदस्य आणि क्रेडाई युवा विंगचे पदाधिकारी विशेष सहकार्य करत आहेत.



