सृजनशील कलाशिक्षक : ज्ञानेश्‍वर माळी

मूळचे जिल्ह्यातील रहिवासी व सध्या पालघर येथील कलाशिक्षक ज्ञानेश्‍वर कौतीक माळी या अवलिया कलावंताचे जळगावच्या अथर्व प्रकाशनाने प्रकाशित केलेले  ”शतचित्राणी” हे पुस्तक रविवारी प्रकाशित होत आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याबाबतचा आढावा घेतलाय उपक्रमशील शिक्षक तथा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी.

धंदेवाईक कलावंत नावलौकिक प्राप्त करून भौतिक सुख समृद्ध होतात . मात्र, कालौघात सामाजिक निर्विवाद आदरयुक्त प्रतिष्ठाच महत्वाची . जळगाव येथील युवराज माळी संचलित अथर्व पब्लिकेशन्स निर्मित ” शतचित्राणि ” हे सृजनशील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कौतिक माळी रेखांकित व्यक्तींच्या स्केचबुक संग्रहाचे प्रकाशन रविवार ( १० ऑक्टोंबर २०२१ ) सकाळी साडेदहा वाजता पालघर येथे होत आहे . त्यानिमित्त माळी यांच्या कलास्पंदनांचा जळगाव येथील उपक्रमशील शिक्षक तथा भारतरत्न डॉ . ए . पी . जे . अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी करून दिलेला नानाविध कलाप्रवासाचा  परिचयात्मक शब्दालेख …

“Jack of all trades  master of nothing ” या म्हणीला अपवाद आहेत हरहुन्नरी बहुआयामी  कलाशिक्षक  ज्ञानेश्वर माळी .. धंदेवाईक कलावंत नावलौकिक प्राप्त करून भौतिक सुख समृद्ध होतात मात्र कालौघात आदरयुक्त प्रतिष्ठा महत्त्वाचे ठरते ! द्रव्य लोभाच्या अधीन  कलेचा व्यापार करीत व्यावहारिक तडजोड करणाऱ्या कलावंतांना कधीच सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही . सद्गुणांशिवाय आदर्श सौंदर्य एक अभिशाप आहे या अर्थाची एक चिनी मार्मिक म्हण आहे .विचार, आचार व सामाजिक बांधिलकीसह राष्ट्रीय कार्य ही कलावंतांच्या कार्याची चतुःसूत्री लोकोत्तर प्रतिष्ठेची गुरुकिल्ली आहे . आचार,विचार ,शील यांच्या बेरजेचे सौंदर्य सरांच्या ऋजू व्यक्तिमत्त्वात आहे . असे पालघर जिल्ह्यातील आर्यन एज्युकेशन सोसायटीचे म.नी. दांडेकर हायस्कूलचे शालीन कलाशिक्षक ज्ञानेश्वर कौतिक माळी उपाख्य  नानासाहेब. निव्वळ विद्यार्थीप्रियता नव्हे तर सहकार्‍यांच्या गळ्यातील ताईत व पालघर जिल्ह्याचे कलाभुषण अशी लोकप्रियता लाभलेले अजातशत्रू व्यक्तिमत्व ! त्यांच्या सामान्य वर्तणूकीत अलौकिक असामान्यत्व दडलयं ! ” शतचित्राणि ” या ज्ञानेश्वर माळी यांच्या स्केच बुक संग्रहाचे जळगाव येथील सुप्रसिद्ध अथर्व प्रकाशन निर्मित पुस्तकाचे प्रकाशन १० ऑक्टोंबर २०२१ रोजी  मा. श्री . भारत द . हाटे ( विश्वस्त – आर्यन एज्युकेशन सोसायटी , मुंबई . यांच्या अध्यक्षतेखाली व पुस्तक प्रकाशन मा . अनुपमा ताई खानविलकर ( वृत्त निवेदिका , ज्येष्ठ पत्रकार – झी 24 तास मराठी न्युज चॅनल यांच्या शुभहस्ते प्रकाशित होत आहे .

प्राप्त पुरस्कार व मान सन्मान

* आदर्श कलाध्यापक पुरस्कार ( महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ ,पुणे )

* राज्यस्तरीय श्री संत सावता भूषण आदर्श कला शिक्षक पुरस्कार ( आंतरराज्य कला उत्सव औरंगाबाद )

* संकेत आदर्श कला शिक्षक पुरस्कार

* गुणवंत शिक्षक पुरस्कार ( लायन्स क्लब ऑफ सफाळे )

* आमचे कलाभुषण पुरस्कार ( भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्र )

* कलातपस्वी पुरस्कार ( पालघर जिल्हा कलाध्यापक संघ )

* खानदेश भूषण पुरस्कार (खानदेश एकता मंडळ सप्तशृंगी  चॅरीटेबल ट्रस्ट ,नवी मुंबई )

* गुरूगौरव पुरस्कार ( मयूर आर्ट अकॅडमी, परळी वैजनाथ )

* महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ( जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ मुंबई )

उल्लेखनीय सन्मान

* उत्कृष्ट समन्वयक ( भारत निवडणूक आयोग ) * महात्मा ज्योतिबा फुले उन्नती समाज मंडळ (  विरार / पालघर ) * पालघर पोलीस ठाणे * पालघर साहित्य कला मंच * पालघर तालुका कला, क्रिडा संघ * लायन्स क्लब ऑफ पालघर * पालघर सरस महोत्सव कच्छ युवक संघ

सन्माननीय नियुक्ती

माजी कार्यवाह : पालघर जिल्हा कलाध्यापक संघ

आधी केले मग सांगितले

पालघर पंचक्रोशीतील छोट्या पाड्यांवरील अशिक्षित पालकांना  शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व पारंपारिक कलेला प्रोत्साहन देऊन संवर्धित करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्य मोफत देणे, वेळप्रसंगी वार्षिक फि भरणे, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गुणगौरव करणे .आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना कला साहित्य विविध संस्थांतर्फे मोफत मिळवून देणे .कॅम्लीन व डोम्स कंपनी यांच्या सौजन्याने कला उपक्रम स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांची कलाभिरुची वाढवणे .विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर व्हावे यासाठी विनामूल्य मार्गदर्शन वर्ग .कला,कार्यानुभव विषयानुषंगे वारली पेंटिंग, ग्लास पेंटिंग ,वाळू शिल्प, टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रमांचे आयोजन .शिक्षक हा आजीव विद्यार्थी असतो असे म्हटले तरी बरेच जण निरुत्साही असतात परंतु सरांची नेहमी स्वतःला अपडेट व कालप्रवाहा सोबत राहण्याची उत्कंठा व ध्यास आहे म्हणूनच पालघर, ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ आयोजित कृतीसत्र तसेच विविध कंपन्यांनी पुरस्कृत  रंग कार्यशाळेसाठी, साहित्य निर्मिती व नवोक्रमातही सानंद सहभाग घेतात .पालघर स्थानिक संस्थांच्या विविध शैक्षणिक , सामाजिक, सांस्कृतिक स्पर्धांच्या आयोजनात नेहमी मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षक म्हणून हक्काने काम करणे सर विहित कर्तव्य मानतात !

शाळा सुधार व शैक्षणिक उठावांतर्गत केलेले उल्लेखनीय कार्य

चित्रकला साहित्य निर्मिती करणाऱ्या नामवंत कंपन्यांकडून शाळेतील प्रत्येक वर्गाला ॲक्रेलिक बोर्ड मोफत मिळवून दिले . शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधून भरघोस आर्थिक मदत मिळवून दिली .

कोरोना कालावधीत राबविलेले विशेष उपक्रम

” शाळा बंद पण शिक्षण सुरु ” या उपक्रमा अंतर्गत इयत्ता निहाय घटकानुसार व्हिडिओ निर्मिती करून मार्गदर्शन .गुगल मीट , झूम ॲप्स या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्यक्ष चित्राकृतींच्या प्रात्यक्षिकांन्वये मार्गदर्शन,कोरोना काळात निर्भयपणे सेवा देणारे देवदूत यांच्याशी संपर्क व मदत कशी करावी याबाबत विशेष मानसशास्त्रीय मार्गदर्शन, स्वतःच्या आरोग्यासंदर्भात आहार-विहार व उपचाराबाबत कोणत्या दक्षता घ्याव्या या संदर्भात फलक लेखनातून व भित्तिचित्र माध्यमातून विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन,कोविळ – १९ जागतिक महामारीत समाजातील व्यक्तींची पेन्सिल स्केचेस काढून मिळालेल्या रकमेतून तत्कालीन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे  ११००० रुपयांचा धनादेश ज्ञानेश्वर माळींनी पालघर जिल्हाधिकारींना सुपूर्द केला .ज्येष्ठ,श्रेष्ठ व आप्तेष्ट यांचे कृष्णधवल पेन्सिल स्केचेस काढून कलोपासनेत वेळ सत्कारणी लावला.काही अंशी कलेतून समाजसेवेतून राष्ट्रसेवा करता आली ; कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या संधीचं  त्यांनी अक्षरशः सोन केलं ! अविस्मरणीय स्मृती जवळ असाव्यात कलानंद वारंवार अनुभवता यावा यासाठी त्यांनी १०० भावविभोर चेहऱ्यांचा पुस्तकात समावेश केला.पुस्तकात पूज्य पिताश्रीं अण्णासाहेब स्वर्गीय सुपडू सुतार  ( निवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक ) यांचे रेखाटनं समाविष्ट झाले  हे लुल्हे कुटूंबांच अहोभाग्य ! तदनंतर त्यांचा कार्यपरिचय होऊन वर्धिष्णूही झाला.

देशहितासाठी आत्मभान व सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी यासाठी मतदानाविषयी जनजागृती मोहीम, अवयव दान जनजागृती , सीमेवरील जवानांसाठी रक्षाबंधनानिमित्त ” धागा शौर्याचा, राखी अभिमानाची “, मकरसंक्रांतीनिमित्त ” आकाशी झेप घे रे पाखरा , इजा नको पोहोचवू पक्षांना ” खास उपक्रम, पालघर रेल्वे स्टेशन सुशोभीकरण,शालेय विद्यार्थ्यांना  गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळा , ” स्वच्छ भारत सुंदर भारत ” अंतर्गत शिरगाव समुद्र किनारा स्वच्छता अभियान,वाळू शिल्प स्पर्धा या नानाविध मूल्यात्मक राष्ट्रीय,सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतीक आणि पर्यावरणीय कामाचा सपाटा तेही केवळ अठरा वर्षांच्या सेवाकाळातील कलोपासनेतून विहित कर्तव्य सांभाळून केलेलं व्यापक कार्य थक्क करते ! माळी सरांचा अथक कलाप्रवास अत्यंत प्रेरक व भुषणास्पद आहे !  त्यांच्या अलौकिक कार्याने भारावून मी  त्यांना प्रश्न केला , ” आपले भावी उद्दिष्ट्ये व संकल्प काय आहेत ? ज्यातून तुमची एक प्रतिमा समाजात व माध्यमांत निर्माण होईल ? विनम्रपणे सर उत्तरले , ” मी ठरवून काहीही करत नाही. नोकरीत अध्यापनाच्या  फलश्रुतीचे १०० % टक्के समाधान कधीच मिळत नाही.

तात्पर्य रोजीरोटीशी ईमान  ठेवून माझ्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण कलानिपुण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे! कलाध्यापनात दुर्लक्ष करून शाळाबाह्य उपक्रमातून स्वप्रतिमा निर्माण करणे अक्षम्य विद्यार्थीद्रोहच आहे ! सेवा परायणतेमुळे सरांचे हृदय व आत्मा पवित्र झाला ! कलावंताप्रमाणे प्रतिभावान शिक्षकही जन्मास यावा लागतो . ” कर्तव्याच्या तत्त्वाने आत्मार्पणाचे सामर्थ्य येते ; उदात्त कर्तव्यनिष्ठेने मनुष्यात विलक्षण चैतन्य येते ” या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी सांगितलेला गुणविशेष समर्पित कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी यांच्या मनीमानसी रुजून कृतीप्रवण  झाला  म्हणूनच ज्ञानेश्वर माळी आनंदाच्या असंख्य सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधनाच्या पाशांमधून कला स्वातंत्र्याचा, समाजपरिवर्तनाचा आस्वाद घेऊ शकतात हे  गुढ रहस्य लक्षात आलं !

माळीसरांना कलेचा वारसा नसतांना चित्रकलेकडे कसे  वळले ? दगडात देव असतोच त्याला फक्त आकार ,रंग देणारा कारागिर भेटावा लागतो  … सर रम्य भुतकाळात मला घेऊन गेले… ज्येष्ठ बंधू स्थापत्य अभियंता प्रमोद माळी सुट्टीत घरी वरणगाव फॅक्टरीत येत . चित्रकलेत त्यांची उच्च कला अभिरुची. ..त्यांनी एका सुंदर युवतीचे लक्षवेधी चित्र काढले व तिच्या हातात सफरचंदाऐवजी गुलाबाचे सुंदर फूल काढले या सृजननशील कलेन मी भारावलो , प्रेरीत झालो .तसेच एक चित्रकला शिक्षक नातेवाईक यांचे चित्रे ही मला खूप भारावून टाकायचे ….विद्यार्थीदशेत गाय वासरू काढले . .त्यांची आकारबद्धता , लकबी आणि मातृवात्सल्य भाव सुरेख चित्रीत झाल्याचे पिताश्री कौतिकरावांनी भरभरून कौतुक केले ! त्यावेळी प्रथमतः त्यांच्यातील सुप्त चित्रकाराचा आत्मशोध सरांना लागला ! तत्पूर्वी  त्यांनी इंटरमिजिएट परीक्षा दिलेली होती .माध्यमिक शाळेत कलाशिक्षक सिनकर हे ज्ञानेश्वरने काढलेली चित्र सर्व वर्गात अभिमानाने दाखवत . कलाशिक्षक सिनकर यांनी प्रेरणा व प्रोत्साहनाने चित्रकलेची वाट दाखवली.

पुढील कलाशिक्षण ए. टी.डी .आणि बी.एफ.ए .पेंटींग १९९६  ते २००० या चार वर्षाच्या कालावधीत  जळगाव जिल्ह्यातील ललित कला केंद्र चोपडा येथे घेतले.पहिल्या वर्षी एकूण चार वर्षाच्या विद्यार्थ्यांमधून मी काढलेल्या जूनियर कामिनी बाविस्कर यांच्या व्यक्तिचित्र रेखाटनाला आणि बैलाच्या पायाला नाल ठोकणाऱ्या  कारागिराच्या प्रत्यक्षदर्शी चित्रांना पारितोषिक मिळाल्याने सर्व गुरुजनांचे लक्ष वेधले ! वार्षिक कला महोत्सवातील गुणदर्शन कार्यक्रमातील गायन व नृत्यानेही सर्वांची मने जिंकली . परिणामी प्रत्येक विविध कला प्रकारातील कला कौशल्य गुरुजनांनी मला आत्मियतेने  दिली.

प्रामुख्याने काम्पोझिशनमध्ये प्राचार्य राजेंद्र महाजन, स्केचेसमध्ये सुनील तायडे सर, लँडस्केपमध्ये ज्ञानेश्वर जगदाळे, पर्स्पेक्टिव्ह मध्ये सुनील बारी सर, साळी सर, नेवे सर, विनोद पाटील सर तर पुढील जे .जे . स्कुल ऑफ आर्टच्या मुंबई येथील कला शिक्षणात पोट्रेट मध्ये वासुदेव कामत व अनिल नाईक यांनी मला कलामंत्र दिले .कला मेहनत, शिस्त, नियमित अभ्यास, समायोजनशीलता आणि कलागुणांमुळे आणि आई-वडिलांच्या सुसंस्कारांमुळे त्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देखील प्राप्त झाले . दरवर्षी ते गुणवत्तेने  पहिला क्रमांक  पटकावत ! गुरूंनी हिऱ्यासारखे पैलू पाडले . सेवाकाळात भावनांची पवित्रता, उद्देशांची उच्चता व प्रवृत्तीची निर्दोषता विनम्र व नि : स्वार्थी कलासेवेने पालघर जिल्ह्यातील शासन-प्रशासन विविध अशा संस्थांचा मान सन्मानही त्यांना प्राप्त झाला .त्याचे श्रेय सर कृतज्ञतेने गुरुवर्य तथा  ललित कला केंद्र चोपडा प्राचार्य माननीय राजू महाजन यांच्या चरणी समर्पित करतात.

सद्गुरु राजू महाजन यांनी मला अखंड प्रेरणा व उर्जा दिली परिणामी श्रद्धेचा सुवर्ण मुकुट मी फक्त त्यांच्याच मस्तकी ठेवीन .गुरुवर्य सुनील तायडे यांनीही अन्य कलागुणांना भरभरुन दाद दिल्याचे ते आवर्जून सांगतात. कलावंत नेहमी अतृप्त असावा.अतृप्तता व अस्वस्थता यातच सृजनशीलतेची बीजं असतात .कोविळच्या लॉक डाऊन काळात स्केचेस काढून ते समाधानी झाले नाहीत त्यानंतर त्यांनी श्री गणेशाची चित्रे रेखाटली. सृजनशीलता व रचनात्मक अशी सुमारे ३५ ते ४० अप्रतिम गणेश रुपे त्यांनी रेखाटली.प्रत्येक काम आत्मचिंतन व निष्ठापूर्वक करण्याचा त्यांना ध्यास .  गणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन करण्याचा त्यांचा मनोदय आहे.क्षेपणास्त्र अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असतात परंतु त्याला पृथ्वीच्या कक्षेबाहेर पोचण्यासाठी प्रचंड अग्नि तथा ऊर्जेची आवश्यकता असतेच …

सरांना अखंड कार्यउर्जा कशी व कोठून मिळते  याबाबत विचारले असता ते भाऊक होऊन म्हणाले,” आज मी ज्या ठिकाणी पोहोचलो ते फक्त माझ्या सौभाग्यवती मंगला यांच्यामुळेच…. ती माझी इग्निशन पावरच नव्हे तर माझी सखीही आहे . तिच्या प्रेमामुळे  कामाचा व्याप व ताप सुसह्य होऊन माझी आंतरिक सृजनशीलता फुलते, बहरते व कार्यप्रवृत्त होते .शारीरिक नात्याने ती माझी अर्धांगिनी असली तरी ती सर्वार्थाने जन्मोजन्मीची मार्गदर्शक मुक्ताईच आहे आणि सुपुत्र याज्ञिकचा अमाप प्रेमादर तर माझी जीवन संजीवनी आहे … ज्येष्ठ बंधू स्थापत्य कला आरेखक प्रमोद माळी , माध्यमिक शिक्षक साहेबराव माळी, भगिनी सौ. अंजना गुलाब माळी व सौ . रंजना सुरेंद्र महाजन यांच्यापाठी जन्माला आलेले शेवटचं शेंडेफळ ज्ञानेश्वर सर  उपाख्य नाना , म्हणून कुटूंबात  सर्वांचे लाडके ! पण या अंतिम क्रमांकाच्या शेंडेफळानं आपल्या कला सेवेतून अडावद (ता. चोपडा ) या जन्म भूमीचा अन् विशेषत्वे माळी घराण्याचा महाराष्ट्रात नावलौकीक वाढवणारा वंशाचा प्रथितयश सुप्रसिद्ध  पहिला ” युनिक  कुलदिपक ” ठरला !

सरांना कुटूंबियां इतकेच  घरा बाहेरही तेवढेचं प्रेम मिळाले .विवेक आणि प्रज्ञा त्यांच्या मनोरथाची अजोड चाकं ! त्यांच्या सुसूत्रीकरणामुळे  कलाप्रवास निर्विघ्न ऐतिहासिक  होतोय … ज्येष्ठ बहिण भावंडांच्या अमाप प्रेमाची शिदोरी तर आहेच …. हा यशोमार्ग विशेष सुसह्य करणारे पितृतुल्य प्रफुल्ल घरत, प्रतिभा ताई कदम, कलाप्रेमी प्रमोद पाटील तसेच शिवसेनेचे राजेंद्र गावित ( खासदार पालघर ) ,प्रशांत पाटील ( उपाध्यक्ष पालघर जिल्हा भा .ज .पा ./ सदस्य जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती ),राष्ट्रवादीचे रामानंद संकेत यांचे अमूल्य योगदान ते कृतज्ञतापूर्वक सांगतात तसेच आर्थिक कलाश्रय प्रेमादराने देणारे कलासक्त सुंदरम कंपनीचे रामचंद्र शेठ यांचाही ते ऋणनिर्देश करतात. आपल्या प्रपंचाची कोंडी फोडून त्यांनी राष्ट्रप्रेमाने समाजोन्नतीसाठी कला प्रपंच समर्पण वृत्तीने केला म्हणून ज्ञानेश्वर माळी संसारी असूनही त्यांच्या नि : स्वार्थी व उत्तुंग कलेच्या कार्याने ते वानप्रस्थ आहेत असे माझे मार्मिक विधान निश्चितच अनुचित होणार नाही .

” छंदांच्या आनंदा ओहोटी नसते

  नित्य उधाणते सु -ख तेथे

मोक्ष, मुक्ती सारे छंदी सामावले

स्वर्ग सुख आले निवासाला “

 

Protected Content