कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीस प्रारंभ झाला असून येत्या काही तासांमध्ये कुणाची सरशी होणार हे स्पष्ट होणार आहे.

चिंचवड आणि कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अलीकडेच मतदान झाले होते. आगामी काळातील राजकीय स्थितीच्या पार्श्‍वभूमिवर या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक ही अतिशय महत्वाची मामली जात आहे. भाजपचे कसबा पेठ आणि चिंचवडचे आमदार अनुक्रमे मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांसाठी दोन्ही बाजूंनी मोठा जोर लावण्यात आला.

कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यात मुख्य लढत होत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत झाली. यात चिंचवड येथील लढत ही तिरंगी होणार असून यात कलाटे हे नेमकी किती मते घेणार ? यावर निकाल अवलंबून असल्याचे मानले जात आहे. मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झीट पोलमध्ये कसब्यातून रवींद्र धंगेकर तर चिंचवडमधून अश्‍वीनी जगताप यांची सरशी होणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. पहिल्यांदा पोस्टल मतांची मोजणी होणार असून नंतर मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएमच्या माध्यमातून मतगणना होणार आहे. साधारणपणे अकरा वाजेपर्यंत दोन्ही ठिकाणच्या निकालाचे निर्णायक कल समोर येतील अशी शक्यता आहे.

Protected Content