गरुड विद्यालयात “सायबर क्राईम” विषयावर समुपदेशन

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ता. जामनेर द्वारा संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी या विद्यालयात “सायबर क्राईम” या विषयावर पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.

संस्थेचे प्रेरणास्थान बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर मुख्य अतिथी पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व संस्थेच्या संचालिका देवश्री काशीद याचा सत्कार मुख्याध्यापक एस.पी.उदार यांनी केला. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी.उदार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले भावी आयुष्य कसे जगावे व व्यायाम करण्याचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन करतांनाच फसव्या जाहिरातींना किंवा कॉल्सला बळी पडू नका व आपला ए.टी.एम पिन किंवा ओ.टी.पी हा कोणालाही देऊ नका. कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी दिला.

यानंतर अध्यक्षीय भाषण संस्थेच्या संचालिका देवश्री काशीद यांनी केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशे मध्ये आपलं ध्येय निश्चित कसे करावे या बद्दल सांगितले. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये उपमुख्याध्यापक ए.बी.ठोके, विज्ञान विभागाचे ज्येष्ठ प्रा. व्ही.डी.पाटिल, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा. एस बी.शेळके, प्रा.आप्पा महाजन, विज्ञान प्रमुख प्रा.संजय पाटील, ज्येष्ठ शिक्षक बी.एम. कुमावत,जी.टी कुमावत तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी.पाटील यांनी केले तर आभार डी बी.पाटील यांनी मानले केले. कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

 

Protected Content