भुसावळ प्रतिनिधी । शेतात पाडलेले प्लॉट एन.ए. करण्याच्या मोबदल्यात १० हजाराची लाच मागणाऱ्या भुसावळ प्रांत कार्यालयातील महिला अव्वल कारकून यांना नंदूरबार लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे भुसावळ प्रांत कार्यालयात खळबळ उडाली आहे.
प्रतिभा मच्छिंद्र लोहार (वय-४०) असे १० हजाराचे लाच घेणाऱ्या अव्वल कारकूनचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका तक्रारदाराने प्लॉट एन.ए. करण्यासाठी भुसावळ प्रांत कार्यालयात त्यांनी सादर केले होते. संशयित आरोपी अव्वल कारकून प्रतिभा लोहार यांनी कामाच्या मोबदल्यात १० हजार रूपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. दरम्यान तक्रारदार यांनी थेट नंदूरबार लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार १७ सप्टेंबर २०२१ रोजी सापळा रचला असतांना लोहार यांना संशय आला. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच स्विकारली नाही. परंतू लाच मागितल्याचे सिध्द झाले होते. त्यानुनसार त्यांना आज मंगळवारी ५ ऑक्टोबर रोजी नंदूरबार पथकाने ताब्यात घेतले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या निरीक्षक माधवी वाघ व त्यांच्या सहकार्यांनी केली.