शेंदूर्णी, प्रतिनिधी । येथील ममता हॉस्पिटल हे कोरोना डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असून शासनाने ठरवून दिलेल्या माफक दरात कोरोना रुग्णांना उपचार व आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेंदुर्णी परिसरातील अत्यंत गंभीर स्थितीत असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना जळगाव, जामनेर, पाचोरा औरंगाबाद अश्या ठिकाणी उपचारासाठी पाठविले जात होते. या शहरातील सरकारी व खासगी दवाखान्यात वेळेवर बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांना शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. आता अत्यवस्थ असणाऱ्या अनेक रुग्णांना वेळीच उपचार उपलब्ध झाल्याने त्यांना प्राण गमवावे लागणार नाही. हॉस्पिटलमध्ये एकूण १० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये ३ आयसीयू + ऑक्सिजन बेड, ३ ऑक्सिजन बेड व ४ जनरल बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. या रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन पाईपलाईन सुविधा असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार व ठरवून दिलेल्या दरानेच रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार रुग्णांना शासनाच्या नियमानुसार हॉस्पिटल बिल अदा करावे लागणार आहे.