तरूणावर चॉपर हल्लाप्रकरण: चौघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । अंत्ययात्रेत खुन्नस दिल्यावरून १३ सप्टेंबर रोजी दोन गटात तालुक्यातील कुसुंबा येथे गँग वार झाला होता. यात एकावर चॉपरने वार केला होता. त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्याच खासगी हॉस्पिटल समोर एकावर आठ ते दहा जणांनी चॉपरने हल्ला केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील चार जणांना जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली आहे.

सोनू उर्फ कुलदिप पोपट आढळे (वय-२८) रा. समता नगर, मुकेश उर्फ पप्पू रमेश शिरसाठ (वय-२२) रा. हुडको पिंप्राळा, अजय देवीदास सपकाळे (वय-२१) रा. बुध्दविहार हुडको पिंप्राळा आणि राकेश अशोक सपकाळे (वय-२२) रा. समता नगर अशी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुसुंबा येथे मित्राच्या अंत्ययात्रेत दोन गँग समोरासमोर आल्याने एकमेकांना खुन्नस दिली गेली. अंत्ययात्रा संपताच परतीच्या मार्गावर या दोन्ही गँग एकमेकांवर तुटून पडल्या. त्यात चॉपर, लोखंडी सळई, दगडांचा वापर करुन एकमेकांवर हल्ले चढवले गेले. दोन जण गंभीर जखमी झाले. यातील एका जखमी तरुण बसस्थानक परिसरातील डॉ. भंगाळे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच वेळी दोन्ही गट येथे दाखल झाल्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.

दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांना भिडले. जखमी झालेल्या किरण खर्चे याच्या गटाला मदत करण्यासाठी आलेल्या खिलेश पाटील तरुणावर या ठिकाणी गटाकडून चॉपरने वार करण्यात आले होते. त्यामुळे हा तरुण देखील जखमी झाला. त्याने हल्ला करणाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार देण्यास नकार दिला होता. हा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपाण्यात आले होते. या आधारावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात नाना तायडे यांच्या फिर्यादीवरून आठ ते दहा जणांविरोधात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरक्षक अकबर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार, पोहेकॉ जितेंद्र सुरवाडे, नाना तायडे, अविनाश देवरे यांनी कारवाई करत आज सकाळी संशयित आरोपी कुलदिप आढळे, मुकेश शिरसाठ, अजय सपकाळे, राकेश सपकाळे यांना अटक केली. पुढील कारवाई जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content