धरणगावात फेरीवाले व विक्रेत्यांच्या कोरोना चाचणीस प्रारंभ

धरणगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार आजपासून शहरातील दुकानदार, फेरीवाले व अन्य विक्रेत्यांच्या कोरोना चाचणीस प्रारंभ करण्यात आला आहे.

धरणगाव शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना संपूर्ण शहरातील फेरीवाले, पथविक्रेते तसेच किराणा दुकानदार, सलून व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते , फळविक्रेते यांची कोरोना चाचणी करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारीयांनी दिले होते.

या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व विक्रेत्यांची कोरोना रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यास आजपासून सुरुवात झाली. आज एकूण ७३ विक्रेत्यांची कोरोना रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली त्यापैकी एका विक्रेत्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला.
तसेच शहरातील सर्व दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांची कोरोना चाचणी होणार असून सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी केले आहे.

सर्व दुकानदारांनी तीन ते चार दिवसात कोरोनाची शासकीय चाचणी करून घ्यावी. जेणे करून व्यवसाय करणे सर्वांना सोयीचे होईल. तसेच मास्क लावल्याशिवाय कुणालाही वस्तू देऊ नका. अशा व्यक्तीला वस्तू देताना आढळले तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
तसेच यामध्ये दुकानदार पॉझिटिव्ह आढळल्यास त्यास दुकान बंद ठेवण्याची गरज नाही. पर्यायी व्यक्ती दुकान सुरू ठेवू शकतो. आगामी तीन ते चार दिवसात सर्व व्यावसायिकांची कोरोना चाचणी होणार असून उर्वरित व्यावसायिकांनी स्वतः चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील मुख्याधिकार्‍यांनी केले आहे.

दरम्यान, धरणगाव वासियांनी कोरोना संबधित सर्व नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच सर्व व्यापारी , दुकानदार बांधवांनी सोशल डीस्टनसिंग चे पालन करून मास्क वापरावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले.
सदर विक्रेत्यांचे तपासणी करणेसाठी आवश्यक नियोजन नायब तहसीलदार मोहोळ,तबरेज खाटीक, वैद्यकीय अधिकारी डॉ बारेला तसेच नपा कार्यालय अधिक्षक संजय मिसर, रवींद्र गांगुर्डे, निलेश वाणी, राजेंद्र माळी, जयेश भावसार, प्रवीण देशपांडे, दीपक चौधरी, दीपक वाघमारे, विनोद रोकडे तसेच सर्व नगरपालिका कर्मचारी करीत आहेत.

Protected Content