नोटांमधूनही कोरोनाचा प्रसार शक्य : आरबीआयचा दावा

 

नवी दिल्ली – नोटांमधूनही कोरोनाचा प्रसार शक्य असल्याचा दावा आरबीआयने केला असून याबाबत सीएआयटी या संस्थेने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर दिले आहे.

दैनंदिन वापरातील नोटा जीवाणू आणि विषाणूंचे वाहक आहेत का, असा प्रश्‍न कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना प्रश्‍न विचारला होता. 

मंत्रालयाकडून हे पत्र रिझर्व्ह बँकेला पाठविण्यात आले. त्यावर बँकेने नोटांमधून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे उत्तर दिले आहे. बँकेने नोटा कोरोना व्हायरससह अन्य बॅक्टेरिया आणि विषाणूंच्या वाहक ठरू शकतात, अशी सूचना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सला देण्यात आली आहे. नोटांतून प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे आवाहन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने व्यापार्‍यांसह नागरिकांना केले आहे. या संदर्भात संबंधीत संघटनेने निवेदन जारी केले आणि डिजिटल पेमेंट हाच सद्य:स्थितीत उत्तम पर्याय असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड इत्यादी विविध ऑनलाईन डिजिटल माध्यमांतून घरबसल्या पैशांची देवाणघेवाण होऊ शकते आणि नोटांशी संपर्क टाळता येऊ शकतो. मोजताना नोटांना थुंकी अजिबात लावू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Protected Content