नवी दिल्ली वृत्तसंस्था | देशभरात कोरोनाचा संसर्ग किती विलक्षण प्रमाणात वाढीस लागलाय याची प्रचिती गेल्या चोवीस तासांमधील रूग्ण संख्येमधून दिसून आली आहे.
मागील चोवीस तासांत देशात कोरोनाचे तब्बल १ लाख ४२ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात देशात २८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील २४ तासात १,४१,९८६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ४०,९२५ रुग्ण महाराष्ट्र, पश्चिम बंगालमधील १८,२१३ रुग्ण, दिल्लीमध्ये १७,३३५ नवे रुग्ण, तमिलनाडुमध्ये ८,९८१ तर कर्नाटकमधील ८,४४९ रुग्णांचा समावेश आहे. आज आढळलेल्या १.४२ रुग्णांमुळे देशात बाधितांचा आकडा आता ३,५३,६८,३७२ वर पोहोचला आहे.
देशात मागील आठवड्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा २२ हजारच्या जवळपास होता. फक्त एका आठवड्यात हा आकडा सहा पटींनी वाढून तब्बल १ लाख ४२ हजारांवर पोहोचला आहे. तर देशात मागील चोवीस तासांत ४०,८९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होणार्या रुग्णांची संख्या आता ३,४४,१२,७४० वर पोहोचली आहे. सध्या देशात ४,७२,१६९ रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३,०७१ वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. राजधानीत आधीपासून अस्तित्वात असलेल्या कोरोना डेल्टा व्हेरिएंटसह, ओमायक्रॉन व्हेरिएंट देखील पसरत आहे. कोरोनाच्या संकटात आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर बरे होत आहेत. ओमायक्रॉन हा सौम्य आहे आणि डेल्टाच्या तुलनेत त्याची लागण झालेल्या रुग्णांना कमी वेळात डिस्चार्ज दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कोरोनाची रूग्णसंख्या वाढीस लागली तरी घाबरून न जाता सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य यंत्रणांनी केले आहे.