विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनातर्फे समन्वयक कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अलिकडच्या काळात समाजात कमी झालेली संवेदनशिलता, सामाजिक एकता, बंधुभाव हा पुन्हा निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी केले.

 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी, जिल्हा /विभागीय समन्वयक यांची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना प्रा. माहेश्वरी बोलत होते. यावेळी मंचावर रा.से.यो.चे प्रादेशिक संचालक अजय शिंदे, रा.से.यो.च्या अहमदनगर येथील इटीआय प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. जी.एस. गायकवाड, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते.

 

प्रा. माहेश्वरी म्हणाले की, आपल्या व्यक्तीमत्वातील संवेदनशीलता , एकता, बंधुभाव ही मुल्ये हरवत चालले आहेत की काय अशी शंका येवू लागली आहे. आपण आरोग्याची तपासणी काही कालवधीनंतर सतत करीत असतो. तशी या मूल्यांची तपासणी आपल्या व्यक्तीमत्वात करायला हवी. हे मूल्ये रूजविण्याची ताकद शिक्षणात आहे. विद्यार्थी देखील दायित्व स्वीकारणारा तयार व्हायला हवा. समाजात जे बदल अपेक्षीत आहे ते घडविण्याची क्षमता रा.से. योजनेत आहे. त्यामुळे रा.से.यो. च्या अधिकाऱ्यांवर अधिक जबाबदारी आहे असेही ते म्हणाले. रा.से.योच्या माध्यमातून ‘हरीत वारी – निर्मल वारी’ आणि ७५ मियावाकी वन निर्माण करणे या दोन प्रकल्पांमध्ये रा.से.यो. चे योगदान मोलाचे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्रारंभी रा.से.यो. चे संचालक प्रा. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले.  ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. पंचप्रण शपथ यावेळी घेण्यात आली. उद्घाटनानंतरच्या सत्रात रा.से.यो. कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अजय शिंदे व डॉ. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून रा.से.यो.च्या उपक्रमांची माहिती दिली. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी रा.से.यो. मार्फत विद्यापीठात सुरु असलेल्या कार्यक्रमांची माहिती देतांना मियावाकी वन प्रकल्प निर्माण करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. रा.से.यो. च्या वर्षभरातील शिबीर / उपक्रम यामध्ये पारितोषिक प्राप्त केलेल्या स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन प्र- कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते. डॉ. सचिन नांद्रे यांनी या कार्यशाळेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. मनिष करंजे व डॉ. सुरेखा बनसोडे यांनी केले. डॉ. विजय पाटील यांनी आभार मानले.

Protected Content