भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रातील सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना महानिर्मीतीच्या नियमानुसार नियमित भत्ते अदा करावे, या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र समोर बुधवार १९ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून उपोषण सुरू केले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या सुरक्षा विभागात कंत्राटी कामगार गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. दरम्यान या कंत्राटी कामगारांना परिपत्रकाच्या आदेशानुसार नियमित भत्ते समाविष्ट करावे. याबाबत आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार सुरक्षा विभागातील कंत्राटी कामगारांच्या भत्त्यांबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन प्रशासनाने दिल्याने त्यावेळी कंत्राटी कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतु अद्यापपर्यंत या विषयावर कुठलीही चर्चा झालेली नाही. सदरील कंत्राटी कामगार हे महानिर्मिती तसेच महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करीत असल्याने महानिर्मितीच्या नियमाप्रमाणे त्यांना भत्ते देणे आवश्यक आहे. याबाबत कंत्राटी कामगारांनी वेळोवेळी निवेदन देऊन मागणी केली आहे. याबाबत कामगारांनी ६ जून रोजी देखील मागण्यांची निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांना उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला होता. दरम्यान प्रशासनाकडून कुठलीही हालचाली दिसून आले नाही. त्यामुळे येथील कंत्राटी कामगारांनी बुधवार १९ जून रोजी सकाळी ११ वाजेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा इशारा कंत्राटी कामगारांनी दिला आहे.