परभणी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर बुधवारी परभणी शहर आण जिल्हा बंदची हाक देण्यात आली. शेकडोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असून परभणी पिंगळी मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. काही महिन्यापूर्वीच या पुतळ्याचे सुशोभीकरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी संबंधित व्यक्तीला चांगलाच चोर दिला.या घटनेची माहिती मिळताच मोंढा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र, या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली.
या घटनेनंतर मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण शहरामध्ये तणावपूर्ण शांतता होती. मात्र, आज सकाळी शहरातील काळी कमान, खानापूर, फाटा तसेच कॅनॉलकडे जाणाऱ्या मार्गावर आंबेडकरी चळवळीतील समर्थकांनी टायर जाळून या घटनेचा निषेध केला. परभणी शहरात आज बंदची हाक दिल्याने शहरातील बाजारपेठ बंद असल्याचे पाहायला मिळाले. शहरातील कोणत्याच भागात कोणतेच दुकान सुरू नाही. शहरातील विविध भागातील नागरिकांनी रस्त्याने मोर्चा काढून संविधान प्रतिकृतीचा अवमानाचा निषेध व्यक्त केला. तसेच ठिकठिकाणी घोषणाबाजी केल्या. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, नागरिक, युवक संतप्त झाले असून आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी ते करत आहेत.
परभणी बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चौख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरसीपीच्या तीन तुकड्या परभणी शहरात तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी. आरोपीची नार्को टेस्ट करत घटनेच्या मागे सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केली. तसेच आरोपीविरोधात कडक कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे.