चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील मुंदखेडा रोडवरील महादेव चौक परिसरात एका बांधकाम कंत्राटदाराच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र वाल्मिक महाजन (वय ४२, रा. मुंदखेडा रोड, चाळीसगाव) हे व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार आहेत. २५ मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. हा प्रकार गुरूवारी २६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समोर आला. याप्रकरणी रवींद्र महाजन यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी संदीप घुले हे करीत आहे.




