मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.चंद्रकांत हंडोरे हे महाराष्ट्रातील दलित समाजातील नेते म्हणून ओळखले जातात. गेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील काँग्रेसने हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्या वेळी झालेल्या क्रॉस मतदानामुळे हंडोरे यांचा पराभव झाला होता. या वेळी हंडोरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या वेळी देखील निवडणुकीचे गणित मांडताना काँग्रेसचा कस लागणार आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी सहा उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या वेळी विधिमंडळातील संख्याबळ पाहाता भाजपचे 3, एकनाथ शिंदे यांचा 1, अजित पवार यांचा 1 उमेदवार निवडून येईल. तर एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजप चौथा उमेदवार देण्याची शक्यता असल्याने या वेळी देखील आमदारांच्या गुप्त मतदानामध्ये गडबड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.