मुंबई वृत्तसंस्था । काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बुरूज ढासळला असल्याचे राजकिय क्षेत्रात मानले जात आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघांचे हर्षवर्धन पाटील यांनी सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. तसेच सलग तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग 14 वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आत्तापर्यंत एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
पाटील यांच्या भाजपा प्रवेशाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष आता उघड उघड पाहायला मिळणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मदत मिळा वी यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी केली होती. या बदल्यात राष्ट्रवादीने इंदापूरची जागा काँग्रेसला सोडावी असे ठरले होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली. यामुळे त्यांना सर्वाधिक मताधिक्य तालुक्यातून मिळाले. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच राष्ट्रवादी इंदापूरची जागा सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. यामुळे हर्षवर्धन पाटील यांची अस्वस्थता वाढली होती.