कॉंग्रेसला जिल्ह्यात हव्या आणखी तीन जागा

congress

जळगाव, प्रतिनिधी | आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपाला अंतिम स्वरूप मिळालेले नाही. जिल्ह्यात कॉंग्रेसच्या वाट्याला दोन जागा येण्याची चर्चा रंगली असतांना कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर, जळगाव शहरासह जळगाव ग्रामीण, जामनेर व अमळनेर या जागांची मागणी लावून धरली आहे. त्यातही जळगाव शहर मतदार संघावर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या मतदारसंघात तरुण व स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असल्याचे देणार असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील उमेदवारी संदर्भात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यानुसार जळगाव शहरात गेल्यावेळी असलेले उमेदवार डॉ. राधेश्याम चौधरी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने यावेळेस त्यांच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे. जळगाव शहर मतदार संघात कॉंग्रेसतर्फे नवा चेहरा निवडणूक रिंगणात उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे मतदारांचा भाजपकडे वाढता कल पाहता किमान मतदान तरी पक्षाच्या उमेदवाराला मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. जळगाव ग्रामीण, जामनेर व अमळनेर या तीन जागा वाढवून मिळण्यासाठीही कॉंग्रेस प्रयत्नात आहे. कॉंग्रेसला जिल्ह्यात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किमान मतदान पदरात पाडून घेणे अपेक्षित आहे. आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने जिल्ह्यातील ११ विधानसभा जागांपैकी ९ जागांवर लढण्याचे ठरविले असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. कॉंग्रेस आपल्या उमेदवारांची संभाव्य यादी गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. याआधी राष्ट्रवादीशी चर्चा करून अतिरिक्त तीन जागा मागण्यात येणार आहेत. जळगाव शहरातून डॉ. राधेश्याम चौधरी हे पुन्हा इच्छुक आहेत. परंतु, पक्षाने नवीन चेहरा देण्याचे धोरण स्वीकाल्यास त्यांना उमेदवारी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. डॉ. चौधरी यांनी जळगाव शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आंदोलने केली आहेत. नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न समांतर रस्ते, महापालिकेवरील हुडकोचे कर्ज यासह इतर समस्यांविरोधात वेळोवेळी आंदोलने केली असल्याने कॉंग्रेसचे नाव नागरिकांमध्ये चर्चेत ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. डॉ.चौधरी यांना तिकीट न मिळाल्यास पक्षांत नाराजी नाट्य सुरु होण्याची शक्यता आहे.

Protected Content