मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिंडेनबर्ग अहवालात उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर काँग्रेसने गुरुवारी मुंबईत येथील ईडीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून कथित अदानी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. सेबीने अदानींना खूली लूट करण्याची सूट दिली आहे. ईडीही या प्रकरणी मूग गिळून गप्प आहे, असा आरोप काँग्रेसने या प्रकरणी केला आहे.
या आंदोलनात केंद्रातील भाजप सरकार, ईडी, सीबीआय, सेबी व उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. हा मोर्चा ईडी कार्यालयापर्यंत जाण्यापूर्वीच रोखण्यात आला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले. यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली.