मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आजचा दिवस ऐतिहासिक सांगतानाच तत्त्वाने काम करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचे कौतुक केले. मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे; आमच्यासारख्या तत्त्वाने वागणाऱ्या माणसांसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असे सांगतानाच मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये आलो असून भाजपशिवाय सध्याच्या काळात पर्याय नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजार नाही. आमच्या मतमतदारसंघाचा पाण्याचा प्रश्न सोडवा असेही ते म्हणाले. दरम्यान, हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हर्षवर्धन यांनी योग्यवेळी पक्षप्रवेश केला. एन अनुभवी नेता असल्याने पक्षाला बळकटी येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन यांचे कौतुक केले.