Home Cities पारोळा पारोळ्यात रेशन वाटपाचा गोंधळ; दुकानदारांना धारेवर धरले

पारोळ्यात रेशन वाटपाचा गोंधळ; दुकानदारांना धारेवर धरले


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात ५० टक्के रेशनचा माल वाटप न झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. याप्रकरणी जनसेवक पी.जी. पाटील यांनी शहरातील रेशनिंग दुकानदारांना धारेवर धरले. जळगावहून उशिरा माल मिळाल्याने आणि ऑनलाईन प्रक्रिया बंद झाल्याने वाटप अपूर्ण राहिल्याचा दावा दुकानदारांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्राहकांनी दुकानात माल असूनही मिळत नसल्याच्या तक्रारी पी.जी. पाटील यांच्याकडे केल्या होत्या. पाटील यांनी रेशन दुकानदारांना विचारणा केली असता, त्यांना सांगण्यात आले की, जळगावहून २८ तारखेला रात्री माल मिळाला. त्यामुळे केवळ दोनच दिवस, म्हणजे २९ व ३० तारखेपर्यंत वाटप करता आले. त्यानंतर एक तारखेला ऑनलाईन प्रक्रिया बंद झाल्यामुळे ५० टक्के माल वाटप करायचा राहून गेला, यात आमचा दोष नाही, असे दुकानदारांनी सांगितले.

यावर संतप्त झालेल्या पी.जी. पाटील यांनी सर्व रेशनिंग दुकानदारांना तहसीलदार उल्हास देवरे यांच्या दालनात उभे केले. पाटील यांनी तहसीलदार देवरे आणि पुरवठा अधिकारी गिरासे यांना प्रश्न विचारला की, एका दुकानदाराकडे ४०० ते ५०० ग्राहक असताना दोन दिवसांत माल वाटप कसा शक्य आहे? “दुकानात माल असूनही दुकानदार का देत नाही, यामुळे ग्राहकांचा उद्रेक होत आहे,” असे पाटील यांनी निदर्शनास आणले.

ऑनलाईन प्रक्रिया बंद असल्याने ऑफलाईन माल कसा देता येईल, अशी विचारणाही पी.जी. पाटील यांनी तहसीलदार देवरे यांना केली. यावर तहसीलदार देवरे यांनी जिल्हास्तरावर डीएसओ (जिल्हा पुरवठा अधिकारी) यांच्याशी चर्चा करून ग्राहकांना रेशन कसे देता येईल यासाठी प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.

यावेळी जनसेवक पी.जी. पाटील यांच्यासोबत कुणाल पवार आणि रेशनिंग दुकानदार प्रफुल्ल पाटील, भूषण टिपरे, सुरेश चौधरी, दिलीप सोनकुळे, भिकन महाजन, शकील मिर्झा, मनोहर वाणी, किशोर पाठक, बापू मराठे, दिवाणजी खानोरे, शंतनु पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound