मुंबई प्रतिनिधी | नुकतीच संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली होती. आजचा पहिलाच दिवस मात्र या पहिल्याच दिवशी राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे १२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई मागील अधिवेशनाच्या सत्र काळातली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी, 11 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यात राज्यसभेच्या सभापतींची केलेली अवहेलना, सभागृहाने आखून दिलेल्या नियमांचा गैरवापर, गैरवर्तन करणे, हिंसात्मक कृतीला पाठबळ देणे यामुळे सभागृहाच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.त्याचा निषेध व्यक्त करत सदस्यांवर ही कारवाई करण्यात आली.
निलंबित झालेल्या १२ खासदारामध्ये सर्वाधिक कॉंग्रेसचे फुलो देवी नेताम, छाया वर्मा, रिपुन बोरा, राजमणी पटेल, डोला सेन, शांता छेत्री, सय्यद नासिर हुसेन, अखिलेश प्रसाद सिंग, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे इलामाराम करीम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विश्वम आणि शिवसेनेचे प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई या सदस्यांवर झाली कारवाई करण्यात आली. त्यामुळे या खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही