मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व कायद्याबाबत केलेल्या विधानाविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने, शिवसैनिकांनी एकाला बेदम मारहाण करुन त्या तरुणाचे मुंडण केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिरामणी तिवारी असे फेसबुक युजरचे नाव आहे. नागरिकत्व कायद्याविरुद्ध देशभरात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. अशाच आंदोलनादरम्यान दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केला होता. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, वडाळा येथे राहणाऱ्या राहुल उर्फ हिरामणी तिवारी या व्यक्तीने १९ डिसेंबर रोजी फेसबुकवर एक पोस्ट लिहून उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर टीका केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्नही विचारले. याच पोस्टमुळे भडकलेल्या शिवसैनिकांनी तिवारी यांना लक्ष्य केले आहे.
उद्धव ठाकरे आम्हाला श्रद्धास्थानी आहेत. त्यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट लिहून कुणी आक्षेपार्ह भाषा वापरत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असे बजावत स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर व अन्य शिवसैनिकांनी हिरामणी तिवारी यांना घराजवळच गाठले व त्यांना मारहाण करण्यात आली. जुगदर यांनी हिरामणी यांच्या कानशिलात लगावतानाच त्याचे मुंडणही केले.