जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या महासभेत तोडीपाणी, भ्रष्टाचार याविषयी झालेली चर्चा व राष्ट्रगीताचा अवमान झाल्याबाबत नि:पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी महापौर जयश्री महाजन यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिकेच्या सभागृहात बुधवार १५ डिसेंबर रोजी महासभा घेण्यात आली. या महासभेत झालेल्या कामकाजाबद्दल भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी एकमेकांवर तोडीपाणी करीत असल्याचे व राष्ट्रगीताचा अवमान केल्याचे आरोप केले आहे. तसेच भाजप नगरसेवक, नगरसेविका व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी उपमहापौरांना धक्काबुक्की व मारहाण करत धमकावून दमदाटी करीत असल्याचे दिसून आले. भाजपचे सर्व नगरसेवक व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या दिशेने मंचावर धावत गेले, असे स्थानिक स्थानिक वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले आहे. या सर्व बाबींना तिलांजली देण्यात येऊन महासभेत गुंडगिरी करण्यात येत होती. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात येऊन राष्ट्रगीताचा अवमान केल्याबद्दल व तोडीपाणी, भ्रष्टाचार, बेकायदेशीर कृत्य केल्याबाबत सर्वांची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी. दरम्यान या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैय्या पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, अमोल कोल्हे, दिलीप माहेश्वरी, माजी नगरसेवक सुनील माळी, नईम खाटीक, माजी नगरसेवक राजू मोरे, राहुल टोके, सलीम इनामदार डॉ. काटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.