पिंप्राळा रथोत्सवाची तयारी पूर्णत्वास : ना. गिरीश महाजनांची उपस्थिती (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 07 09 at 7.20.08 PM

जळगाव (प्रतिनिधी ):  पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान आणि वाणी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४४ वर्षांची परंपरा असलेला पिंप्राळा रथोत्सव शुक्रवार दि. १२ जुलै रोजी साजरा होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या रथोत्सवाची तयारी पूर्णत्वास आली आहे. प्रिंप्राळा रथोत्सवाचे यंदाचे १४४ वे वर्ष आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला हा रथ वाजतगाजत काढण्यात येतो. यावेळी पालकमंत्री ना. गिरीश महाजनांची विशेष उपस्थिती राहणार आहे

या रथोत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजता अभिषेक करून ११.३० वाजता महापूजा करून केली जाईल. दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर सीमा भोळे आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे,उपमहापौर आश्विनभाऊ सोनावणे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. रथोत्सवासाठी विठ्ठल मंदिर संस्थान कार्यकारिणीतील सदस्य परिश्रम घेत आहेत.

महाआरती झाल्यावर रथाच्या प्रदक्षिणेसाठी प्रस्थान होईल. त्यापूर्वी भाविकांच्या हस्ते रथाला मोगरी लावण्यात येईल. या रथाला पिंप्राळ्यातील चावडीपासून सुरुवात होईल. त्यानंतर रथ कुंभारवाडा, मढी चौक, धनगर वाडा, मशिद, गांधी चौक, मारूती मंदिरमार्गे रात्री साडेआठला पिंप्राळ्यातील चावडीजवळ येईल. रथाच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात येणार आहे. रथावर विद्युत रोषणाईदेखील केली जाणार आहे. रथाच्या दिवशी पिंप्राळ्यात मोठी यात्रा भरते. पिंप्राळ्यातील माहेरवाशीण खास रथोत्सवासाठी सासरहून येतात. रथोत्सवासाठी म्हणून ;पंजरी प्रसाद; तयार केला जातो. त्यात धने, गूळ, खोबरे, सुंठ व विलायची हे पाच घटक असतात. जवळपास सात ते आठ तास हा रथोत्सव चालणार आहे, अशी माहिती रथोत्सव समितीकडून देण्यात आली आहे.

Protected Content