“शावैम”मध्ये एक लाख कोरोना नमुने तपासणी पूर्ण

जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी ४ फेब्रुवारी रोजी सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत कोरोनाच्या नमुना तपासण्यांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कमी वेळात तपासणी करून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करीत केवळ साडे आठ महिन्यातच एक लाख तपासणी करून ‘लवकर निदान,लवकर उपचार’ करण्यात शासकीय वैद्यकीय यंत्रणेला यश आलेले आहे.

सुरुवातीला जिल्ह्यात सदर प्रयोगशाळा सुरु नसल्याने जिल्ह्यातील कोरोना नमुने तपासणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात पाठवावी लागत होती. नंतर आयसीएमआर आणि डीएचआर यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी, अधिष्ठाता यांनी प्रयत्न करून विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २२ मे २०२० पासून सुरु करण्यात आली. त्यानंतर तपासणी अहवाल जलद प्राप्त होऊन संशयित रुग्णांना वेळीच योग्य ते उपचार होण्यास मदत झाली.

सुरुवातीला १०० ते १४० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत होती. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला जैन इरीगेशन जैवतंत्रज्ञान विभागातून एक अतिरिक्त आरटीपीसीआर चाचणी तपासणीचे मशीन प्राप्त झाले. त्यामुळे आता प्रयोगशाळेची नमुने तपासणीची क्षमता दिवसाला ५०० एवढी वाढली आहे. गुरुवार दि. ४ फेब्रुवारी रोजीपर्यंत करण्यात आलेल्या एकूण चाचण्यापैकी ९ हजार ९८६ रुग्ण (९.९८ टक्के) पॉझीटीव्ह आढळले आहे. महाविद्यालय व रुग्णालयाला अत्याधुनिक “ऑटोमेटेड आरएनए एक्स्टेक्शन” मशीन देखील प्राप्त झाले असून त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित आहे.

प्रयोगशाळेच्या तपासणीसाठी लागणारे उपकरण व किट्स वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांचेमार्फत हाफकिन, मुंबई यांचेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली  प्रयोगशाळेत विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले, डॉ. शुभांगी डांगे, डॉ. प्रियंका पाटील, डॉ. प्रियंका शर्मा यांच्यासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, चतुर्थश्रेणी कर्मचारी परिश्रम घेत आहे.

 

 

Protected Content