रखडलेले विविध प्रकल्प पुर्ण करा – माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विधानपरिषदेत मागणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या काळातील मंजूर असलेले विविध विकास कामे, रखडलेले प्रकल्प तातडीने पुर्ण करण्यात यावे अशी मागणी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषद सभागृहात करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलेल्या तारांकित मागण्या पुढील प्रमाणे-
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेर असलेले सिंदखेड राजा येथील विकास आराखड्याला गती देण्यात यावी, जिजाऊ सृष्टीचा विकास करण्यात यावा, अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली आहे. खडसे हे महसूलमंत्री तथा बुलडाणा जिल्हा पालकमंत्री असताना त्यांनी सिंदखेडराजा विकास आराखड्याला ३११ कोटी रुपये निधीची तरतूद करून इतर तांत्रिक बाबी पूर्ण करून विकास आराखड्याला गती दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ ला विधानसभा निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून याचे उद्घाटन सुद्धा केले होते. परंतु अद्याप सुद्धा या कामाला गती मिळाली नाही. तरी सिंदखेडराजा विकास आराखड्याला निधी उपलब्ध करून देऊन गती देण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात केली.

केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व गोपीनाथराव मुंडे यांचे औरंगाबाद येथे भव्य दिव्य स्मारक निर्माण व्हावे, यासाठी स्मारकाच्या कामाला मंजुरी दिली होती. त्यासाठी स्वतः औरंगाबाद जाऊन स्मारकाच्या जागेची निश्चिती केली होती. सर्व तांत्रिक बाबी पुर्ण केल्या होत्या, परंतु अद्यापही स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे काम सुरू झाले नाही, याबबद्दल एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये प्रश्न उपस्थित केला. हेतुपुरस्करपणे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाला विलंब लावल्या जात आहे. असा सत्ताधाऱ्यांवर आरोप केला तसेच लवकरात लवकर स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे निर्माण करावे अशी आग्रही मागणी केली.

एकनाथराव खडसे हे बुलडाणा जिल्हयाचे पालकमंत्री असताना अल्पसंख्याक विभाग आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र सैलानी येथे मनोरुग्णालय मंजुर केले होते. सैलानी येथे देशभरातून उपचारासाठी मनोरुग्ण येत असतात श्रद्धेला आधुनिक उपचाराची जोड मिळावी, रुग्णांवर योग्य उपचार व्हावे, त्यांना निवास व इतर सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एकनाथराव खडसे यांनी सैलानी येथे ४० खाटांच्या मनोरुग्णालयास मंजुरी दिली होती, ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी देखील खडसे यांनी सभागृहात केली.

शिवाय खडसे कृषी मंत्री असताना त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय कृषी महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील तळणी येथील ग्रामस्थांनी कृषी महाविद्यालय स्थापन व्हावे, यासाठी १०० एकर जमीन मोफत स्वरूपात शासनाला देऊ केली होती. तसा सर्व कागदपत्रांचा प्रस्ताव तळणी ग्रामस्थांनी शासनाला दिला होता. तसेच १०० एकर जमीन शासनाकडे वर्ग करण्यात आली आहे.

एमसीआरने सुद्धा या जागेची पाहणी करून तसा अहवाल शासनाकडे दिला होता. शासनाकडे एकमेव तळणी ग्रामस्थांचा प्रस्ताव सादर झाला होता. त्याअनुषंगाने मार्च २०१६ साली तत्कालीन अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात बुलडाणा जिल्हयासाठी शासकीय कृषी महाविद्यालयाला मंजुरी दिली होती. परंतु या महाविद्यालयाला मंजुरी मिळून देखील हे सुरू करण्यात आले नाही, हि बाब एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषदमध्ये मांडून हे महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली, शिवाय सोबत उत्तर महाराष्ट्रात कृषी विद्यापीठाची निर्मिती व्हावी अशी मागणी केली.

Protected Content