जळगाव प्रतिनिधी । शहरातील शास्त्री टॉवर चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू असतांना महिला पोलीस कर्मचारी आणि उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यात वाद झाला. उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या विरूध्द महिला पोलीस कर्मचारीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहे. यात शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीधारकांसह रिक्षा व चारचाकी वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास महापालिकेचे उपयुक्त संतोष वाहूळे यांच्या उपस्थितीत शहरातील टॉवर चौकात वाहन तपासणीचे काम सुरू होते. दरम्यान, दीड वाजेच्या सुमारास जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी दुचाकीने उस्मानिया पार्क येथे जात असताना उपायुक्त संतोष वाहूळे यांनी त्यांची दुचाकी आडविली. कुठे जात आहात याची विचारणा केली. यावर आपण महिला पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. वाहूळे यांनी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवा आणि घरी जा असे सांगितले. त्यावर आपल्याकडे ओखळपत्र नसल्याचे सांगितल्याने वाहूळे यांनी कारवाईला सुरूवात केली. यावरून महिला पोलीस कर्मचारी आणि उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यात चांगलाच वाद झाला. हे प्रकरण थेट शहर पोलीस ठाण्यात गेले. महिला पोलीस कर्मचारी यांनी उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान राजकीय नेत्याच्या मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला आहे.