कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० लाखांची भरपाई द्या, प्राचार्य विनोद गायकवाड यांची मागणी

यावल, प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शिक्षकांना ५० लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी केली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस न देता कोरोनाची ड्युटी करताना शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि जिल्ह्यातील शिक्षक संभ्रमित होते. जळगांव जिल्हयाचे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कोरोना काळात फ्रंट लाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी लस देण्याची मागणी केली आणि प्रशासनाने ती मान्य केली. तांत्रिक मुद्दे पुढे करून लस देणे टाळत असलेल्या प्रशासनाला प्रा.गायकवाड यांनी चांगलेच धारेवर धरले होते.

रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सर्व आरोग्य केंद्र आणि सर्वेक्षणाला नेमलेले शिक्षक, कोविड सेंटरवर, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र या ठिकाणी शिक्षक आज फ्रंट लाइन वर्कर म्हणून काम करत आहेत. प्रशासकीय कार्यपद्धतीमुळे शिक्षकांचे काही जिल्ह्यात बळी गेले आहेत. विमा कंपनी प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देते. मग शिक्षक या सर्व ठिकाणी काम करताना संपर्कात येत नाही काय, प्रत्यक्ष संपर्कात विमा लाभ मिळणार नाही का?. मग अशा प्रकारे बळी गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित करण्यात केला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी हमी दिली जाते. लस देण्याबाबत सकारात्मकता दाखवली जाते, परंतु प्रत्यक्षात काम करत असताना मात्र सुरक्षिततेविषयी सोयी सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनामुळे शिक्षकांचा मृत्यू झाला आहे अश्या शिक्षकांच्या परिवाराला ५० लाख रुपये भरपाई द्यावी अशी मागणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे गायकवाड यांनी केली आहे.

Protected Content