प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 27 कोटी रुपयांची भरपाई मंजूर

जळगाव प्रतिनिधी । प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 खरीप हंगाम करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना राबविण्यात आली होती. याअंतर्गत विमा कंपनीकडून 27 कोटी 7 लाख 29 हजार रुपयांची (2707.29 लाख रुपये) भरपाई मंजूर झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेअंतर्गत अमळनेर, पारोळा व चोपडा या तालुक्यातील उडीद, मूग आणि अमळनेर तालुक्यासाठी, बाजरी/कापूस या पिकांसाठी खरीप हंगामातील पावसाच्या खंडामुळे प्रतिकूल परिस्थिती (Mid season Adversity) निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या पिकांची अधिसूचना काढून विमा कंपनीला 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेशित केले होते. तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही याबाबत शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे आयसीआयसीआय लोबार्ड (भारती एक्सा) विमा कंपनीकडून एकूण २७०७.२९ लाख रक्कम मंजूर झालेली आहे.

सदर नुकसान भरपाई अमळनेर, पारोळा, चोपडा तालुक्यातील २० मंडळामध्ये मूग पिकांसाठी ०.४४ लाख, तर उडीद पिकाकरीता ०.०६ लाख रुपये, अमळनेर तालुक्यातील ८ मंडळामध्ये बाजरी पिकासाठी ०.०३ लाख, तर कापुस पिकाकरिता २७०६.७६ लाख रक्कम मंजूर झालेली आहे. सदरची रक्कम विमा कंपनी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचेही श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहेत.

 

Protected Content