Home धर्म-समाज रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन सोहळ्याला सुरूवात

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन सोहळ्याला सुरूवात

0
108

अयोध्याधाम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक सोहळ्याच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याला शनिवारी प्रारंभ झाला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पवित्र नगरीत दाखल झाले.

शनिवारपासून राममंदिर परिसरात तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वर्धापन सोहळ्याचा प्रारंभ यजुर्वेद पाठ आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकाने झाला. शरयू नदी किनाऱ्यापासून राम मंदिरपर्यंतचा परिसर ५०० क्विंटल फुलांनी सजविण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी प्रभू श्रीरामचरणी मस्तक टेकवले तसेच विधिवत पूजा करून आरती केली. यावेळी त्यांनी श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास महाराज यांचे आशीर्वादही घेतले. त्यानंतर ५६ पक्वान्नांचा नैवेद्या रामलल्लाला अर्पण करण्यात आला. या वेळी रामलल्लाचा दरबार फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.

गेल्यावर्षी २०२४ मध्ये प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी पौष शुक्ल द्वादशी या दिवशी करण्यात आली होती. यावर्षी ही तिथी ११ जानेवारी रोजी आल्यामुळे शनिवारी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टच्या माहितीनुसार, ११ ते १३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यात गेल्यावर्षी उपस्थित राहू न शकलेल्या सामान्य लोकांचाही समावेश आहे. ‘अंगद टिळा’ येथे जर्मन हँगर तंबू उभारण्यात आला असून ५००० लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound