जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उध्दव ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. हल्ल्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता आंदोलन करण्यात आले. तर हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील निवासस्थानावर मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र पोलीस दलातर्फे देण्यात येणारे सुरक्षा कवच मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता काढण्यात आले. त्यानंतर रात्री दीड वाजता घराच्या आवारात पेट्रोलच्या बाटल्या, दगड, स्टंप फेकून हल्ला करण्यात आला. त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने आरडाओरड केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. एका लोकप्रतिनिधींच्या घरी या प्रकारचा भ्याड हल्ला होणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी घटना आहे. सुरक्षा काढल्यानंतर लगेचच काही तासात अश्या प्रकारचा हल्ला होणे, हे पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या प्रकार कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करावी, या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, जिल्हा युवा अधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, उपजिल्हा युवा अधिकारी विशाल वाणी, अमित जगताप, अमोल मोरे, यश सपकाळे, अंकित कासार, प्रीतम शिंदे, जितेंद्र बारी, लोकेश पाटील यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.