उंदीरखेडे येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटलला आ. चिमणराव पाटलांची सरप्राईज भेट

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील उंदीरखेडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला आमदार चिमणराव पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी दवाखान्यात एकही कर्मचारी नसून याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली असता ग्रामस्थांनी दवाखान्याचा समस्यांबाबत पाढाच वाचला. 

गेल्या ३ महिन्यापासून गावात एकही वेळा डॉक्टर, कर्मचारी आलेला नाही. त्यामुळे आमची गुरे ढोरे पूर्णपणे वाऱ्यावर आहेत. जनावरांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने आमची खूप मोठी गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी आमदार चिमणराव पाटील यांना सांगितले. याची त्वरित दखल घेवून आमदार चिमणराव पाटील यांनी तालुक्याचा वैद्यकीय दवाखाना गाठला. दवाखान्यात जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, जळगांव डॉ.शामकांत पाटील, सहाय्यक आयुक्त, धरणगांव डॉ.कदम, सहाय्यक आयुक्त, चाळीसगांव डॉ.शिसोदे, विस्तार अधिकारी, पशुसंवर्धन, पारोळा डॉ.सूर्यवंशी, पशुधन पर्यवेक्षक, चाळीसगांव डॉ.राजेंद्र इंगावले हे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अपूर्ण कर्मचारी, ग्रामीण भागांत पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टर, कर्मचारी महिना महिना जात नाही त्यामुळे पशुपालन करण्याऱ्या शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय याचा जाब विचारत उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. 

तसेच रिक्तपदांबाबत त्वरित अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवा व त्याची एक प्रत माझ्याकडे पाठवा मी देखील याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. तसेच उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या आधारे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कश्या सुविधा देता येतील व त्यांची होत असलेली गैरसोय कशी दूर करता येईल याबाबत नियोजन करून समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

Protected Content