मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना साद घातली आहे. तुम्ही समोर या, अजूनही वेळ गेलेली नसून समोर बसून आपण ज्या काही अडचणी असतील ते दूर करू असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात लवकरच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा गट लवकरच राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असतांनाच आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांना आवाहन केले आहे. त्यांनी या संदर्भात आज दुपारी एक निवेदन सादर केले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या जे काही सुरू आहे ते अतिशय दु:खदायक असे आहे. आपण तिकडे घर-दार सोडून बाहेर आहात. मला तुमची काळजी वाटते. मी आजवर एका कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली आहे. आताही तुमची काही नाराजी असेल तर या समोर बसून यावर चर्चा करून मार्ग काढू असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल करत असतांना दुसरीकडे आज उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले असून यावर शिंदे गट काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.