जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी एका निमंत्रण पत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.आज पर्यंत जळगाव जिल्ह्यातील 2 लाख 20 हजार घरापर्यंत तर जळगाव शहरात 1 लाख 30 हजार घरापर्यंत निमंत्रण पोहचले आहे.
ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील नगरपालिका, नगरपरिषद व महानगर पालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या पत्येक मालमत्ता धारकांपर्यंत हे पत्र मोबाईल तसेच ईमेल च्या माध्यमातून पोहचविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जळगांव व रावेर या दोन्ही मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विविध कारणामुळे मतदानाची घसरत चाललेली टक्केवारी हा चिंतेचा विषय होत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे, यासाठी स्वीप या उपक्रमाच्या माध्यमातून जळगांव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सोबतच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये यासाठी मतदान केंद्रावर पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. उन्हाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जेष्ठ नागरिक, गरोदर माता, दिव्यांग नागरिक तसेच, गरोदर महिला, नवं बाळंत महिला यांचेसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव शोधण्यात मतदारांना अडचण येऊ नये यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
जळगांव शहर महानगर पालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या प्रत्येक मालमत्ता धारकांच्या मोबाईल क्रमांकावर टेक्स्ट मेसेज च्या माध्यमातून या पत्राची लिंक पोहचवण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात चावडी चावडी वर हे पत्र लावण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने नागरिक आणि मतदारांशी थेट पत्राच्या माध्यमातून तेही अगदी सोप्या व सहज भाषेत संवाद साधून मतदानासाठी आवाहन करीत संवाद साधल्याने या पत्रा विषयी नागरिकांमध्ये उत्स्फूर्त भावना आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी या पत्राचे चावडी चावडी वर सामूहिक वाचन करण्यात येत आहे. पत्राच्या माध्यमातून प्रशासन ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचल्याचे समाधानही नागरिक व्यक्त करीत आहेत. पूर्वीच्या काळात संवादाची आणि दळण वळणाची साधने कमी होती त्यावेळी परिवारातील नोकरी, उद्योग किंवा अन्य कामी बाहेर असलेले सदस्य संवाद साधण्यासाठी पत्राचा वापर करीत होते. या पत्रातील भाषा आपल्या लोकांना समजेल अशी असायची त्याच बाबी लक्षात घेऊन आपला माणूस आपल्या जवळच्या व्यक्तीशी संवाद साधतं आहे. हाच दृष्टिकोन ठेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदानाचा टक्का वाढवा यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात देखील शहरी व ग्रामीण भागातील मतदारांना आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचा दृष्टीने हा पत्र प्रपंच केला आहे.या पत्राच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी आपला व्हाट्स ऍप क्रमांक देखील जाहीर केला असून या क्रमांकाच्या माध्यमातून त्या पत्राचे जाहीर वाचन करून जाहीर वाचनाचा व्हिडीओ व्हाट्सअँप वर पाठविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून आता पर्यंत दोन हजार जणांनी व्हिडीओ, टेक्स्ट मेसेज केले आहेत. त्याचा मोठा ओघ सुरु असून जिल्हा निवडणूक अधिकारी वेळ मिळेल तसे मेसेजला रिप्लाय देत आहेत.
जिल्हाधिकारी यांनी 2 लाखापेक्षा अधिक मतदारांना पाठवले लोकशाही उत्सवाचे निमंत्रण
8 months ago
No Comments