नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यभरात मागील काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. नाशिकमध्येही तापमानाचा पार चांगलाच घसरला आहे. नाशिककर बोचऱ्या थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे तर ठिकठिकाणी शेकोटी समोर बसलेले पाहायला मिळत आहे.
उत्तर भारताकडून ताशी 15 ते 20 किमी वाऱ्यांचा वेग कायम असल्याने महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी दिवसभर गार वारे वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. यंदाच्या हंगामातील निचांकी तापमान मागील दोन दिवसापासून नोंदवले जात आहे. त्याचप्रमाणे शनिवारी थंडाच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने देखील वर्तवली आहे. संशोधन केंद्राने नाशिकला यलो अलर्ट दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रा बरोबरच मराठवाड्यातील काही भागात देखील थंडीची लाट असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येईत आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील थंडीची लाट पसरली असून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसात तापमान सरासरी पेक्षा खाली येताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी कडाक्याची थंडी जानवत आहे.
उत्तर महाराष्ट्रात पुढील 24 तासासाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र थंडी वाढत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आणखी तीन ते चार दिवस राज्यात थंडीची लाट मोठ्या प्रमाणात दिसून येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.