नवीदिल्ली, वृत्तसंस्था | उत्तर भारत थंडीच्या कडाक्याने गारठला असून, राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील सहा राज्यांमध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मध्य प्रदेशमध्येदेखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानाची परिस्थिती अत्यंत वाईट असते तेव्हाच रेड अलर्ट जारी केला जातो.
दिल्लीतील थंडीने मागील जवळपास १२० वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा २ अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. गेल्या १४ दिवसांपासून दिल्लीत तापमान १० अंश सेल्सियसच्या खाली घसरले आहे. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड, लडाख, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. तर, राजस्थानच्या पाच शहरांमध्ये पारा पाच अंश सेल्सियसच्या खाली घसरलाय. दिल्लीतील यंदाचा हिवाळा हा सन १९०१नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा गारठवणारा हिवाळा ठरला आहे.
दिल्लीतल्या थंडीचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झालाय. हावडा एक्सप्रेस, नवी दिल्ली पूर्वी एक्सप्रेससह इतर २४ रेलगाड्या पाच तास उशिराने धावत आहेत. स्कायमेटच्या अनुमानानुसार, ३१ डिसेंबर, १ आणि २ जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये ३ जानेवारीला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो.