धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विख्यात प्राच्यविद्यापंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत कॉ. शरद पाटील यांचा जन्म दि. १७ सप्टेंबर १९२५ रोजी धुळे येथे सत्यशोधक कुटुंबात झाला. खानदेशात सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव होता. कॉ. शरद पाटील यांचे वडील तानाजी तुकाराम पाटील हे पहिल्या पिढीतील सत्यशोधक कार्यकर्ते होते. ब्राह्मणेतर चळवळीतही त्यांचा सहभाग होता.
कुटुंबातील जातीविरोधी संस्कारांमध्ये कॉ. शरद पाटील यांची जडणघडण झाली. खानदेशातील धुळे जिल्ह्यात राहून, कोणतेही विद्यापीठीय किंवा संस्थात्मक पाठबळ नसताना कॉ. शरद पाटील यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर आणि जातिअंताच्या ध्येयवादाशी बाळगलेल्या अविचल कटिबद्धतेमुळे मार्क्स, फुले, आंबेडकर यांचा शोषणाविरोधातला मुक्तिदायी लढा पुढे नेला.कॉ. शरद पाटील यांनी धुळे जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा यांची स्थापना केली. पक्ष नेतृत्त्वाशी जातीच्या प्रश्नावर मतभेद झाल्यामुळे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची दि. १५ ऑक्टोबर १९७८ ला पानखेड्याचा चिंचपाडा, ता. साक्री (जि. धुळे) येथे स्थापना केली. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने आपल्या काही जनआघाड्या सुद्धा तयार केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक शेतमजूर सभा, सत्यशोधक कष्टकरी महिला सभा, सत्यशोधक युवा आंदोलन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना हे होते. तसेच आपल्या पक्षाच्या भूमिकेचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून त्यांनी ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ हे मासिक अनेक वर्षे चालवले. सकप तर्फे वनजमिनी संदर्भातील महत्त्वाचे आंदोलन केले. त्यामुळे आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला.
जातवर्गस्त्रीदास्यअंताचा ध्येयवाद बाळगून कॉ. शरद पाटील यांनी आयुष्यभर मुक्तिदायी राजकारणाच्या अनुषंगाने तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य आणि कलांची चिकित्सक मांडणी केली. दिवसा रस्त्यावरची लढाई आणि रात्री पुस्तकांशी संघर्ष करत त्यांनी जात्यांन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिच्या समाजवादी पूर्तीचे तत्त्वज्ञान विकसित केले. विचार आणि व्यवहाराच्या पातळीवर त्यांनी केलेले मूलगामी कार्य भारतीय समाजातील दास्यमुक्तीच्या क्रांतिकारक लढ्यातील अनन्यसाधारण असे योगदान आहे.
कॉ. शरद पाटील यांनी आपल्या बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी अन्वेषण पद्धतीतून जी भारतीय इतिहासाची मूलगामी फेरमांडणी केली, त्यातून जातवर्गस्त्रीदास्यअंतक क्रांतीचा प्रश्न भारतातील प्रागतिक चळवळींच्या अजेंड्यावर आला. एकेरी जातिविरोधी किंवा एकप्रवाही वर्गवादी तत्वज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट करून त्यांनी बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीच्या आधारे मांडणी करून भारतीय समाजवादाच्या क्रांतीचे प्रारूप स्पष्ट केले. भारतीय इतिहासाच्या ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी या सैद्धांतिक सूत्रातून त्यांनी जातिसंघर्षाचा पट उलगडून दाखवला. जातिव्यवस्थेचे आणि वर्गव्यवस्थेचे क्रांतिकारी सैद्धांतिक आकलन त्यांनी दिले. त्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांचे विचार व कार्य मुक्तिदायी चळवळींसाठी मार्गदर्शक आहे.मुक्तिदायी राजकारणाशी बांधिलकी मानणाऱ्या आणि परिवर्तनासाठी कटीबद्ध असणाऱ्या आपल्या सर्वांसाठी त्यांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी आहे.
दि. १७ सप्टेंबर २०२४ ते दि. १७ सप्टेंबर २०२५ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. कॉ. शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जीवनकार्य अधिक प्रभावीपणे कालसुसंगत स्वरुपात सर्वदूर पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विचारांवर चिकित्सक चर्चा घडवून आणण्यासाठी वर्षभर महाराष्ट्रात विविध कार्यक्रम- उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.हे सर्व कार्यक्रम-उपक्रम आयोजित करण्यात ‘कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती’ पुढाकार घेणार असून स्थानिक आयोजन समितीच्या सहकार्याने ते संपन्न होणार आहेत. कॉ. शरद पाटील यांच्या विचार आणि कार्याविषयी अनुबंध बाळगणाऱ्या तसेच त्यांच्या विचारांशी चिकित्सक संबंध बाळगणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी एकत्रितपणे परस्पर सहकार्यातून संपूर्ण वर्षाचे नियोजन करून कॉ. शरद पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करायची आहे.करिता ‘कॉ. शरद पाटील जन्मशताब्दी महोत्सव समिती’ चे गठन करण्यात आलेले आहे.या समितीच्यावतीने दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दीनिमित्त धुळे शहरात रॅली व परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.रॅली ची सुरुवात सकाळी १०.०० वा.संत रविदास भवन येथून होईल.