राज्यात मुख्यमंत्री हेच सर्वाधीकारी; दोन सत्ता केंद्र नाहीच ! – राऊत

मुंबई प्रतिनिधी । राज्यात दोन सत्ता केंद्र नसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच सर्वाधीकार असल्याचे प्रतिपादन आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

एबीपी-माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. यात महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्रं आहेत का? या प्रश्‍नावर महाराष्ट्रात दोन सत्ताकेंद्र नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सर्वाधिकारी आहेत असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. कोणतीही फाईल ही यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी म्हणजेच शरद पवार यांच्याकडे जात नाही. मुख्यमंत्र्यांकडे सर्वाधिकार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शरद पवार यांनी हे सरकार अस्तित्त्वात आणलं आहे. ते या सरकारचा एक महत्त्वाचा भाग आहेत. शरद पवारांकडे जाऊन कुणी मार्गदर्शन घेत असेल तर त्यात गैर काय? असाही प्रश्‍न राऊत यांनी विचारला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार यांचे मार्गदर्शन आम्ही नेहमीच घेत असतो. त्यांच्या इतका अनुभव असलेला नेता सध्या दुसरा कुणीही नाही. अशा सगळ्या स्थितीत महाविकास आघाडीचं जे सरकार अस्तित्त्वात आलं ते शरद पवार यांच्या पुढाकारामुळे आलं. त्यामुळे त्यांचा सल्ला हा मोलाचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान, या कार्यक्रमात राऊत यांनी सुशांत प्रकरणी सुरू असलेल्या राजकारणावरही भाष्य केले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात जे बोंबलत आहेत त्यांना बोंबलू द्या! असे ते म्हणाले. दीड दमडीच्या भाजपाच्या बिहारमधल्या लोकांनी आमच्यावर शिंतोडे उडवले त्याला आम्ही किंमत देत नाही. हिटलरकडे एक गोबेल्स होता, भारतात १० हजार गोबेल्स आहेत. मी माझ्या लेखात जी भूमिका घेतली ती योग्य आहे. ते माझं कर्तव्य आहे. काही लोक सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एक अजेंडा घेऊन चालले आहेत. मुंबई पोलिसांची प्रतीमा या लोकांनी मलीन केली असाही आरोप संजय राऊत यांनी याप्रसंगी केला.

देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर त्या राज्यासाठी भाजपाचे प्रभारी केलं जातंय ही चांगली गोष्ट आहे. मात्र योगायोग नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सीबीआयकडे प्रकरणं देऊन त्यांच्याकडून उकल होत नाही. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत आहेत, त्यात सीबीआयचा संबंध काय? असाही प्रश्‍न संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलीस काय घडलं ते शोधून काढतील याची आपल्याला खात्री असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.